रातांबी गडनदीतील गाळ काढण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या रत्नागिरी जिल्हाधिका-यांना सूचना ; जलसंधारण चे अधिकारी तातडीने करणार कामाची पाहणी

संगमेश्वर – तालुक्याकील गडनदी ही रातांबी गावातील घरांना लागूनच असल्याने येथील नदीच्या पाण्याचा प्रवाह घरांच्या दिशेने प्रवाहीत होतो या नदीच्या पाण्यामुळे घरांना धोका असल्याबाबत आमदार शेखर निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असताना आता या नदीतील गाळ काढण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांच्या स्तरावर कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत.

रातांबी येथील गडनदीमुळे रातांबी गावाला पूराचा धोका होत असल्याची बाब वारंवार संतोष येडगे यांनी आमदार शेखर निकम आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे या ठिकाणी पूरसंरक्षण भींत बांधणे आणि नदीतील गाळ काढणे कामा तातडीने व्हावे अशी मागणी आहे. रातांबी येथील पूरसंरक्षण भींत आणि गाळ काढणे कामे तातडीने करण्यासंदर्भात आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेत तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
रातांबी येथील गडनदीतील गाळ काढणेबाबत आमदार शेखर निकम यांच्या सूचना प्राप्त झाल्या असून आमदार शेखर निकम यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या कामाची तातडीने पाहणी करुन त्याच्या कार्यवाहीचा अहवाल वरीष्ठ कार्यालयाला पाठवणार असल्याचे जलसंधारण विभागाचे उप विभागीय अभियंता श्री. भराडे यांनी संतोष येडगे यांना सांगितले असून २ फेब्रुवारी २०२४ ला या कामाची संयुक्त पाहणी करणार असल्याचे यावेळी श्री. भराडे यांनी सांगितले.



