पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलनाचा निर्धार; ‘चलो संसद’साठी जंतरमंतरवर पुन्हा विद्यार्थ्यांची गर्दी

नवी दिल्ली : ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान सोमवारी दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या कारवाईनंतरही आंदोलनाची धार कायम आहे. मंगळवारी सकाळपासून शेकडो विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पक्ष (सीजेपी) समर्थक पुन्हा जंतरमंतर येथे एकत्र आले. पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलनाला अधिक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलनस्थळी उभारलेले तंबू आणि व्यासपीठ हटवले होते. त्यानंतर अभिजीत दीपके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जवळील केरळ हाऊस परिसरात रात्र काढली. मात्र, मंगळवारी सकाळीच आंदोलन पुन्हा जंतरमंतरवर सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समाजमाध्यमांवर ही माहिती पसरताच मोठ्या संख्येने विद्यार्थी घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलनस्थळ पुन्हा भरून गेले. हटविण्यात आलेले तंबू पुन्हा उभारण्यात आले असून, पूर्वी उपोषण सुरू असलेल्या व्यासपीठाजवळ आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे.
चॅट्सची चौकशी सुरू
या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित संदेशवहनाची दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इंटरनेट सेवा खंडित झाल्यास संपर्क कायम ठेवण्याची तयारी आणि आंदोलनासाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची चर्चा काही संदेशांमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या संदेशांची सत्यता आणि संबंधित व्यक्तींची ओळख अद्याप तपासाअंतीच स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
ताब्यात घेतल्याचा दावा फेटाळला
सीजेपीने ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा दावा फेटाळून लावत, कोणालाही औपचारिकरीत्या ताब्यात घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा अफवा समाजमाध्यमांवर प्रसारित करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
यापूर्वी सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून, शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच काही आंदोलकांना वकिलांची भेटही नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.
सरकारवर गंभीर आरोप
सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी सरकारवर गंभीर आरोप करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “पोलिसांच्या कारवाईमुळे आम्ही घाबरलेलो नाही. उलट या घटनेनंतर आंदोलनाला अधिक लोकांचा पाठिंबा मिळत आहे. आमच्या शिष्टमंडळाला चर्चेच्या नावाखाली थांबवण्यात आले, मोबाइल फोन जप्त करण्यात आले आणि काही सदस्यांना तासन्तास रोखून ठेवण्यात आले. एकीकडे चर्चेचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांवर लाठीमार केला जातो. हा दुहेरी दृष्टिकोन योग्य नाही. आमचे आंदोलन पुढेही सुरू राहील.”
दरम्यान, दीपके यांनी केलेल्या आरोपांवर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.



