ताज्या घडामोडीराजकीय

शरद पवारांची नरेंद्र मोदींसोबत भेट; NDA प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा वेग

नवी दिल्ली | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी या भेटीमुळे राज्यासह राष्ट्रीय राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येण्याबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर झालेल्या मोदी-पवार भेटीने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.

PMO कडून भेटीचे फोटो प्रसिद्ध

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) या भेटीचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर प्रसिद्ध केले आहेत. या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान मोदी शरद पवार यांचे स्वागत करत त्यांना आपल्या दालनात घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, भेटीतील चर्चेचा विषय अद्याप गुप्त ठेवण्यात आला आहे.

https://x.com/PMOIndia/status/2079808943791190199

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच ही भेट झाल्याने तिच्या वेळेचीही चर्चा सुरू झाली आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मंगळवारी शरद पवार यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यांच्या मागण्या जाणून घेत विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. त्याच दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाली असावी. शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असल्याने या विषयावर त्यांचा सल्ला घेण्यात आला असावा.”

अधिकृत खुलाशाकडे लक्ष

मोदी-पवार भेटीनंतर विविध राजकीय शक्यता व्यक्त केल्या जात असल्या तरी, NDA मध्ये सहभागी होण्याबाबत किंवा कोणत्याही राजकीय निर्णयाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या भेटीत विद्यार्थी आंदोलन, राज्यातील राजकीय घडामोडी किंवा इतर राष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली का, याबाबत आता सर्वांचे लक्ष अधिकृत खुलाशाकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button