शिंदे गटाला मोठा दिलासा; ठाकरे गटातील ६ खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाची मान्यता

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या निर्णयाला मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नव्या पक्षस्थिती (Party Position) सर्क्युलरमध्ये श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे गटनेते म्हणून नोंद करण्यात आली असून पक्षाचे एकूण १३ खासदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे ठाकरे गटातून आलेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही कुणाला तोडणारे नाही, तर जोडणारे आहोत. आमच्यात आलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा विकास आणि जनतेची कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. त्यांना आवश्यक विकासनिधी आणि पूर्ण सहकार्य दिले जाईल.”
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. “लोकप्रतिनिधी पक्ष सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पक्षप्रमुखांनी आपल्या आमदार-खासदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.



