आपला जिल्हा

रत्नागिरी येथे १ ते ३ डिसेंबर रोजी पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन.

रत्नागिरी – प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र राज्य आणि एस. पी. हेगशेट्ये कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, अँड सायन्स रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाहिले प्रगतिशील साहित्य संमेलन दि. १ ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत रत्नागिरी येथे होत असल्याची माहिती प्रगतिशील लेखक संघाचे राज्याध्यक्ष जी. के. ऐनापुरे व महासचिव राकेश वानखेडे यांनी दिली.

नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरीचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, डॉ. भालचंद्र मुणगेकर हे संमेलनाध्यक्ष तर सुप्रसिद्ध हिंदी कवी व कथाकार कुमार अंबुज हे या संमेलनाचे उद्घाटक आहेत.

प्रगतिशील लेखक संघ ही गेल्या ९० वर्षांपासून सांस्कृतिक आणि वाड्:मयीन क्षेत्रात कार्यरत असणारी भारतीय पातळीवरील महत्त्वाची संस्था आहे. समाजात प्रागतिक विचारधारा व मूल्ये मध्यवर्ती ठेवून भविष्यवेधी भान जागृत करणारे प्रकल्प ही संस्था सातत्याने राबवित असते. प्रगतिशील साहित्य संमेलन हे त्या पैकी एक महत्त्वाचे आयोजन आहे. प्रागतिक विचार जाणीवपूर्वक अधोरेखीत करण्याचा प्रयत्न या संमेलनाद्वारे होणार आहे. पारंपारिक वर्चस्ववादी जाणिवेच्या साहित्याला हेतुतः छेद देण्यासाठी हे ३ दिवसांचे संमेलन रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या गोपळबाबा वलंगकर साहित्य नगरी येथे दि. १,२, व ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. गोपळबाबा वलंगकर साहित्य नगरी चे उद्घाटन किरण सामंत यांच्या हस्ते, त्रंबक शंकर शेजवलकर मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन प्रमोद मुनघाटे यांच्या हस्ते तर माधव कोंडविलकर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी ७ वा. क्रांती बांदेकर सभागृहात दीर्घांक सादर होणार आहे. रात्री ८ वा. अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन होणार आहे. त्यामध्ये विनायक येवले, श्रीकांत ढेरंगे, विकास ढोकणे, अविनाश उषा वसंत, चंद्रकांत बाबर, अनिल कांबळी, सरिता पवार, प्रज्ञा भोसले, सिद्धार्थ तांबे, प्रदिप कोकरे, माधुरी मरकड, प्रेषित सिद्धभट्टी, सुचिता कदम, आशिष शिंदे, वाल्मीक वाघमारे यांचा सहभाग असणार आहे.

रात्री ९ वा. कॉ. आर. बी. मोरे विचारमंचावर जयश्री बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याचे कवी संमेलन होणार आहे. शनिवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. कॉ. आर. बी. मोरे विचारमंचावर प्रसिद्ध हिंदी कवी व कथाकार कुमार अंबुज यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये व प्रगतिशील लेखक संघाचे राज्याध्यक्ष जी. के. ऐनापुरे आदी यावेळी विचारपिठावर उपस्थित असणार आहेत.

दुपारी २ वा. ‘मराठीतील समीक्षेची सद्यस्थिती’ या विषयांवर परिसंवाद होणार आहे. वंदना भागवत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात प्रा. दिलीप चव्हाण, उदय रोटे व दत्ता घोलप हे सहभागी होणार आहेत. दुपारी ४ वा. राजकारणातील नैतिकता या विषयांवर परिसंवाद होणार असून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात डॉ. कॉ. भालचंद्र कांगो, ना. उदय सामंत, आ. भास्कर जाधव, आ. यशोमती ठाकूर व खा. इम्तियाज जलील सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ६ वा. ज्येष्ठ कवी रमेश इंगळे उत्रादकर यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन होणार आहे. त्यात सुदाम राठोड, बालाजी सुतार, प्रवीण बांदेकर, रफिक सूरज, सुनीता झाडे, मेघना भुस्कुटे, सारिका उबाळे, दिशा पिंकी शेख, महेश लोंढे, वर्जेश सोलंकी, इग्नेशियस डायस, अनिल साबळे, प्रमोद अहिरे, सत्यपाल सिंग राजपूत, अनिल कांबळी हे सहभागी होणार आहेत. रात्री ९ वा. प्रेम जलसा होणार आहे.

रविवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. क्रांती बांदेकर सभागृहात :सुंदर माझी शाळा’ हा बाल कवितेचा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११:३० वा. कुमार गटासाठी ‘काय वाचावं’ हे चर्चासत्र होणार आहे. रेणू गावस्कर व फारुक काझी मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १०:३० वा. ‘कॉ. शरद पाटील समजून घेताना’ या विषयांवर परिसंवाद होणार असून उमेश बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात वंदना सोनाळकर, सचिन गरुड, राहुल कोसंबी हे सहभागी होणार आहेत.

दुपारी १ वा. किशोर बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुस्लिमांचे बहिष्करण: भारतीय लोकशाही आणि घटनेसमोरील आव्हाने’ या विषयावरील चर्चा सत्रात सरफराज अहमद, चैत्रा रेडकर, ॲड. अभय टाकसाळ हे सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वा. सुरेखा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोकणचे पर्यावरण : साहित्य आणि संघर्ष’ या विषयावर होणाऱ्या चर्चा सत्रात संपत देसाई, विवेक कुडू, सत्यजित चव्हाण हे सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ४ वा. निरा अडारकर व ॲड. कॉ. सुभाष लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होणार आहे. या साहित्य संमेलनास राज्यभरातील प्रगतिशील लेखक संघाचे सर्व पदाधिकारी, साहित्यिक, कवी, लेखक, व साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष येशू पाटील, उपाध्यक्ष डॉ. महेंद्र कदम, डॉ. श्रीधर पवार, डॉ. समाधान इंगळे, कार्यवाह प्रा. प्रसेनजित तेलंग, व प्रा. डॉ. सुधाकर शेंडगे यांनी व रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button