चिपळूणात प्रांत कार्यालयापर्यंत असलेला उड्डाणपूल कापसाळ कॉलनीपर्यंत करावा ; चिपळूणवासींयांमधून जोर धरू लागली मागणी

चिपळूण – चिपळूण शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ( बहादुरशेखनाका ) ते पॉवरहाऊस पर्यंत उड्डाणपूल गरजेचे असतांना हा पूल प्रांत कार्यालया समोरपर्यंत होत असल्याने प्रांत कार्यालय ते पॉवर हाऊस दरम्यान येणाऱ्या शासकीय कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच स्थानिकांना ये-जा करणे अवघड होऊन बसले आहे. विशेष म्हणजे पॉवर हाऊस येथे रस्ता पार करणे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना जिकरीचे बनले आहे. तर या परिसरात अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. तरी प्रांत कार्यालयापर्यंत असलेला उड्डाणपूल कापसाळ कॉलनी पर्यंत व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तर चिपळूण शहरात देखील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बहादुरशेखनाका ) चौक ते हॉटेल अतिथीपर्यंत पिलर उभारण्यात आले आहेत. तर बहादूरशेखनाका बाजूकडून गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या बाजूने सर्व्हिस रोड करण्यात आले आहेत. मात्र, रस्ते दर्जाहीन आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चिपळूण पंचायत समिती समोरून ते पॉवर हाऊस दिशेकडे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बहादुरशेखनाका) ते कापसाळ कॉलनी पर्यंत उड्डाणपूल आवश्यक असताना प्रांत कार्यालयासमोर या पुलाची समाप्ती करण्यात आली आहे. वास्तविक त्या मार्गाजवळच प्रांत कार्यालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, भुमिअभिलेख, न्यायालय, पॉवर हाऊस, सैनिक बोर्डिंग, पोलीस स्थानक अशी अत्यंत गजबजलेली शासकीय आस्थापना कार्यालये, शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव, एडवोकेट नितीन केळकर यांच्यासारख्या महत्त्वाच्या वकिलांची कार्यालये, आमदार शेखर निकम यांचे संपर्क कार्यालय, दैनिक सागर कार्यालय इत्यादी महत्त्वाची ठिकाणे आहेत.
तसेच पाग, पाग नाका, पाग मळा, झरी, बौद्धवाडी, मार्कंडी बुरुमतळी, विरेश्वर कॉलनी अशी रहिवासी केंद्र आहेत. या महत्त्वाच्या ठिकाणच्या महामार्गावरील उड्डाणपूल रद्द करून प्रांत कार्यालयासमोर पूर्ण होत आहे. त्याचबरोबर दररोज छोट्या मोठ्या अपघातांची ही मालिका सुरू झाली आहे. या भागात ये- जा करणे असुरक्षित बनले आहे. उलट बहादूरशेखनाका ते कापसाळ कॉलनी पर्यंत उड्डाणपूल बांधला गेला असता तर पुलाखालील जागा मोकळीच राहिली असती आणि शहरांतर्गत रहदारी सुरक्षित राहिली असती. यामुळे प्रांत कार्यालय ते कापसाळ कॉलनी पर्यंत उड्डाणपूल होणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागला आहे.
पोलीस स्थानक व पागमाळा येथे शहरातील रस्ता हायवे पेक्षा बराच खाली असल्याने या ठिकाणच्या चढावर सुरक्षितपणे ये -जा करणे मुश्किल झाले आहे. तसेच पॉवर हाऊस येथील चौपदरीकरणामुळे रस्ता पार करणे जिकरीचे बनले आहे. तसेच येथील सर्व्हिस रोड देखील पूर्ण करण्यात आलेला नाही. एकंदरीत प्रांत कार्यालयापर्यंत असलेला उड्डाणपूल कापसाळ कॉलनी पर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पॉवर हाऊस जीवघेणा ठरतोय- बापू काणे
चिपळूण शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ( बहादूरशेखनाका )ते कापसाळ कॉलनी पर्यंत उड्डाणपूल आवश्यक असताना प्रांत कार्यालय समोर पर्यंत पूल करण्यात आला आहे. तरी हा पूल कापसाळ कॉलनी पर्यंत नेण्यात यावा. जेणेकरून चिपळूणवासीयांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. तर आता पॉवर हाऊस येथे करण्यात आलेल्या चौपदरीकरणामुळे वाहन चालविणे जिकरीचे बनले आहे. हा परिसर जीवघेणा ठरतोय की काय? अशी भीती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी व्यक्त केली आहे.



