आमदार भास्कर जाधव यांनी सार्वजनिक भाषणात तारतम्य बाळगणे गरजेचे – भाजपा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव.

संगमेश्वर – आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपा नेते ना. रविंद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजपा नेते व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आमदार जाधव यांनी सार्वजनिक भाषणात तारतम्याने बोलावे अन्यथा आम्हालाही त्याच भाषेत उत्तर देणे क्रमप्राप्त ठरेल असा इशारा दिला आहे.
यावेळी श्री. अधटराव म्हणाले
जाधव साहेब, एका प्रसंगाची आठवण करून देणे मला आवश्यक वाटते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट, कोकणातील एका मस्तवाल आमदाराने एका जागृत देवस्थानात जाऊन ग्रामस्थांना शिवीगाळ करत पाणउतारा केला होता. यावेळी ज्यांना शिव्या घातल्या त्यांचे वय, सामाजिक पत आदींचा विचार न करता देवालयात अभद्र भाषेचा प्रयोग करणाऱ्या त्या आमदारांचे काही व्हीडओ अजूनही उपलब्ध आहेत.
पक्षनिष्ठा कोणी शिकवावी यासाठी निकष आहेत. ज्यांना डोळे दाखवून मुंबई सोडली, ज्यांच्यामुळे शिवसेनेला तिलांजली देऊन पवार साहेबांचे चरणी सेवा रुजू केली अशा सरदारांनी पुन्हा स्वगृही गेल्यावर त्यांचेच जोडे डोक्यावर घेतले; असे म्हटले तर वावगे ठरेल काय ? आदिलशाही आणि निजामशाही दोघांनाही सत्तेसाठी असे सरदार हवेतच. त्यामुळे आज आपण ज्या दलात आहात तिथे निष्ठा अर्पण करणे गैर नाही. मात्र आपण जगाच्या पाठीवर एकमेव निष्ठावान शिल्लक असल्याचा जो आव आणता आहात आणि शिल्लक राहिलेल्या सेनेला निष्ठेचे जे पाठ पढवत आहात त्याला तोड नाही.
वास्तविक जे स्वतः मंत्री असताना केलेल्या कामांबाबत कधीही मुद्देसूद बोलताना पाहायला मिळत नाहीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या कार्यशैलीबाबत नकारात्मक बोलणे निंदनीय आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या कोण्या एका टप्प्यावर आपण केलेल्या सहकार्याबाबत जाहीर चर्चा करावी. हे आवाहन स्विकारले तरी मग अनेक गोष्टींची उकल होईल. आगामी काळातील आपल्या अंधःकारमय भविष्यावर मात करण्यासाठी चाललेले हे उपचार यावेळी फलद्रूप होणार नाहीत.
मा.चव्हाण साहेबांची बोलण्याची एक खास शैली आहे. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीत सुसूत्रताही आहे. त्यांनी कोकणात केलेल्या कामांबाबत स्थानिक समाधानी आहेत की नाहीत हे येणाऱ्या निवडणूकांमध्ये तुम्हाला लोकांकडून कळेलच. पण जाधव साहेब, राष्ट्रवादीमधून आता काही केल्या आपण निवडून येणार नाही याची खात्री पटल्यानंतर आपण शिवसेनेत आलात. आणि भाजपाच्या मतदारांनीही मोदीजी व फडणवीस साहेबांकडे पाहून आपणास मतदान दिले त्यामुळेच आपला सहज विजय झाला. या गोष्टी विसरू नका.
तसेही आपल्याबाबत बोलायचे झाल्यास ‘आपणच स्वयंभू आहोत’ अशी तुमची धारणा आहे. ज्या पक्षात असता त्याच्या विरुद्ध बाजूवर आगपाखड करणे एवढे एकच काम तुम्हाला चांगले जमते. राष्ट्रवादीत असताना आदित्य ठाकरेंच्या आवाजाची केलेली नक्कल लोकांच्या आजही स्मरणात आहे. उद्धव ठाकरे नेमके कोणता व्यवसाय करतात हा प्रश्नही तुम्हीच उपस्थित केला होतात. ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांना ‘नमनातील सोंगाड्या’ म्हणणारेही तुम्हीच. अजितदादा पवार यांच्याबाबत टिप्पण्या करणारेसुद्धा तुम्हीच. त्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर आता फक्त ‘नसलेल्या पक्षाचे नेते’ विश्वास ठेऊ शकतात बाकी कोणी नाही.
अजून एक आठवण, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चव्हाण साहेब जेव्हा प्रथमच चिपळूणला आले त्यावेळी आमदार असलेले आपण तब्बल दोन तास सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे वाट पहात होतात. आज ना. चव्हाण साहेब व मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये ठिणगी टाकण्याचा तुमचा प्रयत्न नक्कीच सफल होणार नाही. याची दोन कारणे, पहिले दोघेही प्रोक्त नेते आहेत. त्यांना घराचा-कुटुंबाचा नाही तर राज्याचा संसार सांभाळायचा आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे गेले असताना शिंदे साहेबांबद्दल चव्हाण साहेबांनी केलेल्या कथित टिप्पणीला कोणी महत्त्व देत नाही. आणि दुसरे कारण, सरकारमध्ये समन्वय कायम ठेवण्याचे काम मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत. त्यामुळे तुमचा हा सर्व प्रयत्न निष्फळ ठरणार आहे.
यावेळी चिपळूण मतदारसंघात निवडणुकीला स्वतः उभे राहू किंवा नाही हे ठरवू असे म्हणालात त्यावेळी आपल्या मागे बसलेल्या इच्छुकांचा चेहरा तरी बघायचा होतात हो. असो, हा तुमचा अंतर्गत विषय आहे. त्यावर आम्ही काही बोलू इच्छित नाही. देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते, “बोलने में मर्यादा मत छोडना, गालियाँ देना तो कायरों का काम हैं” त्यामुळे साहेब आता निर्वाणीचा इशारा, इथून पुढे बोलताना राजकीय मर्यादांचे भान राखण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आम्ही, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या आमदारकीचा संवैधानिक आदर बाजूला सारून ‘जशास तसे’ उत्तर देऊ. त्यावेळी मात्र होणाऱ्या मानहानीस आपण स्वतः जबाबदार राहाल. पुढील प्रत्येक विधान सार्वजनिक मर्यादांच्या अधीन राहून कराल हीच माफक अपेक्षा.



