आपला जिल्हा

आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकरमान्यांचे मेळावे सुरु ; मुंबईस्थित ग्रामस्थांच्या मेळाव्याची उद्या ओझरे जि.प.गटातून सुरुवात

दादर येथे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, मुख्य कार्यालय- श्रीकृष्ण मंदिर सभागृहात होणार मेळावा

चिपळूण: चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात कोटयवधी विकास कामे मार्गी लागत असताना आता मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकर चाकरमान्यांचे मेळावे मुंबईत घेण्याच्या दृष्टीने आमदार शेखर निकम यांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखला आहे. याची सुरूवात ओझरे जिल्हा परिषद गटातून होत आहे. या गटातील मुंबईतील ग्रामस्थांचा मेळावा दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता दादर येथे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट,

मुख्य कार्यालय-श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आमदार निकम यांच्या उपस्थितीत होत आहे.

राष्ट्रवादीत दोन गट पडून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आमदार निकम यांनी पुन्हा वेगाने विकास कामांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यातून कोटयवधींचा निधी मतदारसंघात आणत आहेत. रखडलेले विविध प्रकल्प आणि पर्यटनदृष्टया विकासाच्या योजना मतदारसंघात आकार घेऊ लागल्या आहेत. यातूनच गावात झालेली विकासकामे आणि मुंबईकर चाकरमान्यांच्या अपेक्षा यादृष्टीने आमदार निकम यांनी आता जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकरांचे मेळावे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

चिपळूण तालूक्यात पोफळी, अलोरे, खेर्डी, सावर्डे, पेढे, कोकरे आणि मालदोली तर संगमेश्वरातील ओझरे, कोसुंब, कसबा, कडवई, धामापूर, नावडी या जिल्हा परिषद गटात टप्प्याटप्प्याने दर रविवारी मुंबईकरांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. मेळाव्याची सुरूवात रविवारी होणाऱ्या ओझरे गटापासून होत आहे.

आगामी निवडणुकांच्यादृष्टीने पक्षबांधणीवर चर्चा

या जिल्हा परिषद गटात विविध योजना, कार्यक्रमांतर्गत १०२ कोटी ६० लाखांची विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे या मेळाव्यात झालेल्या कामांचा आढावा आणि प्रस्तावित कामांची माहिती या मेळाव्यातून घेतली जाणार आहे. त्याबरोबर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षबांधणी यावरही चर्चा केली जाणार आहे. ओझरे जिल्हा परिषद गटातील गावातील विकास कामांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला आमदार शेखर निकम मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button