आपला जिल्हा

कळवंडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आगामी निवडणुकांवर बहिष्कार ; धरणाचे दुरुस्ती काम रखडल्याने निर्णय

चिपळूण – कळवंडे धरणात उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा पाणीसाठा करण्याचे आश्वासन लघू पाटपबंधारे विभागाने दिले होते. मात्र सध्याच्या स्थितीला धरणात केवळ १५ टक्केच पाणीसाठा आहे. पुढील तिन महिन्यात शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उदवभणार आहे. धरणदुरूस्ती झाली नसतानाच कालव्याची कामे सुरू आहेत. परिणामी धरण दुरूस्ती होत नसल्याच्या कारणास्तव कळवंडेसह पाचाड, रेहेळभागाडी वैजी आणि कोंढे गावच्या सर्व ग्रामस्थांनी आगामी निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला. धरणदुरूस्ती नंतरच कालव्याचे काम सुरू करण्याची मागणी कळवंडे येथील दत्त मंदिरात झालेल्या बैठकीत चार गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्यातील कळवंडे येथील लघू पाटबंधारे विभागाच्या धरणदुस्तीचा मुद्दा पावसाळ्यापासून गाजतो आहे. कळवंडे श्री दत्त मंदिरात कळवंडेचे प्रगतशील शेतकरी व उद्योजक वसंत उदेग व लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्या समवेत झालेल्या बैठकीस कळवंडे, पाचाड, रेहेळभागाडी वैजी व कोंढे येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

चर्चेदरम्यान ग्रामस्थ म्हणाले, सध्या धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा असून पुर्ण क्षमतेने ते कधी भरणार, याची विचारणा केली असता अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. धरण सुस्थितीत असताना, गळती नसतानाही दुरूस्तीसाठी प्लास्टीकचे अच्छादन टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न झाला. भर पावसाळ्यात प्लास्टीकच्या अच्छादनावरील मातीचा भराव निघाला. २०१८ पासून धरण दुरूस्तीचा प्रस्ताव होता. या धरणाची दोनवेळा विविध प्रकारची दुरूस्ती झाली. धरणाच्या मुळ जागेलाच पाझर असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. तर लघूपाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी केलेल्या पाहणीत गळती असल्याचा दावा उपअभियंता विपूल खोत यांनी केला. पावसाळ्यानंतर धरणाची दुरूस्ती झाली नाही. या धरणावर कळवंडेसह, पाचाड, रेहेळभागाडी आणि कोंढे गावची शेती व पिण्याचे पाणी अवलंबून आहे. सद्यस्थितीत चारही गावांत २० हून अधिक वाड्यांना टंचाईची झळ बसत आहे. धरणदुरूस्तीचे काम रखडलेले असतानाच कालव्याची कामे सुरू आहेत. यामध्ये ग्रामपंचायत तसेच संबंधीत शेतकऱ्यांनाही विश्वासात घेतले जात नाही. कालव्याच्या कामात शेतीची नासाडी होत आहे. त्याची नुकसान भरपाई कोण देणार. त्यामुळे आधी धरणाची त्यानंतर कालव्याची कामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. कळवंडेतील धरण मार्गावर जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती आश्वासन मिळूनही झालेली नाही. कळवंडे गावची जलजिवन मिशन योजनेच्या धरणातील विहीरीची पाणी पातळी घटल्याने गावात पाण टंचाई सुरू झाली आहे. दुरूस्तीचे नवे डिझाईन निश्चीत नसल्याचे बैठकीत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिथे पाणी टंचाई भासेल तिथे टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची हमी अधिकाऱ्यांनी दिली. शेवटी संतापलेल्या ग्रामस्थांनी धरणदुरूस्ती मार्गी लागेपर्यत निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेतला.

बैठकीला कळवंडे सरपंच संजय नाचरे, उपसरपंच महादेव उदेग आणि सर्व सदस्य, पाचाड सरपंच नरेश घोले, कोंढे सरपंच माधवी कुळे, अशोक नलावडे, प्रकाश खेडेकर, प्रताप खेडेकर, सदाशिव वरपे, सुरेश बामणे, बाबा आरमारे, सुनिल तटकरे, चंद्रकांत उदेग, संतोष उदेग, विजय पानगले यांच्यासह चार गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button