
मुंबई – पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच या हल्ल्याला चिथावणी देणारे पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी व इतर मागण्यांसाठी १३ पत्रकार संघटनांनी आज मुंबईत तीव्र आंदोलन केले.
आंदोलनापूर्वी हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनवर नेऊन समज देऊन सोडण्यात आले. यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आवारात पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची होळी करण्यात आली. या आंदोलनात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघ, मुंबई प्रेस क्लब, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, मुंबई म्हाडा पत्रकार संघ, पोलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोसिएशन, महापालिका पत्रकार संघ आणि उपनगर पत्रकार संघटना या सहभागी झाल्या होत्या.
पत्रकार हल्ल्याविरोधी कायद्याची मुंबईत होळी करताना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख आणि किरण नाईक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, मुंबई प्रेस क्लबचे गुरबीर सिंग, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे प्रविण पुरो, कार्यकारिणी सदस्य भगवान परब, शरद पाबळे आणि राजा अदाटे, दीपक कैतके, विनायक सानप, विशाल परदेशी, राजन परब, मारुती मोरे, दीपक पवार हे उपस्थित होते.



