राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, पुणे या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

पुणे- राज्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. दरम्यान, आज देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील ४८ तासात राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, पुणे, सातारा, नाशिक व यवतमाळ या जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या दक्षिण भागाकडे झुकला आहे. यामुळे दक्षिण भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस मुसळधार तर माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभगाने वर्तवली आहे. या सोबतच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, पुणे, सातारा, नाशिक व यवतमाळ या जिल्ह्यात ‘रेड व ऑरेंज अलर्ट’ देण्यात आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, या वेळी रस्त्यांना पूर येथे, सखल भागात पाणी साचणे, शहरी भागतात पूलाखाली पाणी साचु शकते. कच्चे रस्ते खराब होऊ शकतात, जुन्या इमारतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. घाट आणि डोंगराळ भागात दरड कोसळू शकते, पाणलोट क्षेत्रात पूर येऊ शकतो त्यामुळे घरा बाहेर पडण्यापूर्वी आपल्या परिसरातील ट्रॅफिक तपासून बाहेर पडावे. तसेच जुन्या इमारती आणि झाडाखाली उभे राहणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेत तर काही ठिकाणी धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे. घाट माथ्यावर १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ज्यात ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे.
पुण्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. साताऱ्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागामार्फत पालघर जिल्ह्यासह वसई विरारमध्ये शनिवारी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुळधार पावसाच्या शक्यतेमुळे सर्व शैक्षणिक आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वसई विरारमध्ये महानगरपालिकेमार्फत अतिवृष्टीच्या वेळी उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसापासून ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या संततधारेमुळे शहरात पाणी तुंबण्याच्या ठिकाणामध्ये दरवर्षीच्या तुलनेत घट झाली असली तरी, शहरातील वागळे इस्टेट एम.आय.डीसी परिसरातील रस्त्यांवर मात्र मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसुन येत आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या या भागात हजारो चाकरमानी नोकरी धंद्यानिमित येत असतात, त्यांना या खड्डयाचा मनस्ताप सोसावा लागत आहे.



