MSEDCL Bill : बिलाचे आकडे फुगले; आकार व शुल्काने वीज ग्राहकांमध्ये संताप
मुंबई प्रतिनिधी - कृष्णा कोळापटे.

मुंबई – महागाईने कंबरडे मोडलेल्या नागरिकांना आता महावितरणने वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार आणि इतकेच काय तर पुन्हा वीज शुल्क असे नान्हा तऱ्हेचे भुर्दंड आकारून अक्षरशः लुटत आहेत.दर महिन्याचे बिलाचे आकडे फुगत असल्याने ग्राहकांमध्ये संताप आहे.
मुंबई – उन्हाळा संपल्याने जून महिन्यात बहुतांश नागरिकांनी कुलर व एसीचा वापर कमी केला. परिणामी मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात विजेच्या मागणीत घट झाली. त्यामुळे नागरिकांना वीज बिलातून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र, जून महिन्यातही विविध आकार आणि शुल्क लावल्याने विजेचे बिल फुगले आहे. महावितरणच्या मूळ वीज आकारासोबतच स्थिर आकार, वहन आकार आणि वीज शुल्काची भर घातली आहे.
महावितरणच्या म्हणण्यानुसार, हा जरी वीजबिलाचाच भाग असला तरी या नावाने वेगवेगळे शुल्क आकारल्या जात आहे. त्यामुळे बिलाच्या एकूण रकमेत वाढ झाली आहे. वीज वहन आकार दीडशे, दोनशे, अडीचशे आणि त्यापुढे सुद्धा ग्राहकांच्या बिलात शुल्क समाविष्ट केले आहे. स्थिर आकार शंभर रुपयांच्या वर तर वीज शुल्क दोनशे, अडीचशे, तीनशे असे बिलात समाविष्ट आहे. ग्राहकांना विविध आकार आणि शुल्काच्या नावापोटी लावलेली वेगवेगळी रक्कम गोंधळात टाकणारी आहे.
वहन आकार १.१७ रुपये तर वीज शुल्क १६ टक्के
बिलात वहन आकारासोबतच स्थिर आकार आणि वीज शुल्क वसूल करण्यात येत असल्याने त्यात आणखी वाढ झाली आहे. वहन आकाराचे आकडे बुचकळ्यात टाकणारे आहे. हा दर १.१७ रुपये प्रमाणे आकारण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर वीज शुल्क १६ टक्के आकारण्यात येत आहे. त्यामुळे बिल आणखी वाढल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत.
ग्राहकांना याबाबत माहितीच नाही
बिलातील स्थिर वीज आणि वहन आकार तसेच वीज शुल्क नेमके काय आहे हे ग्राहकांना कळतच नाही. ते सरसकट येणारी बिलाची रक्कम पाहतात. बहुतांश ग्राहकांना हे विविध आकार कशामुळे लावण्यात आले याची माहितीच नाही.
बिल न भरल्यास पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ग्राहकांचा नाइलाज आहे. वाढणाऱ्या बिलामुळे ग्राहकांमध्ये महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.
१ एप्रिलपासून वीज दरवाढ झाल्याने सर्वच आकारात वाढ झाली आहे. त्यामुळे बिल भरमसाट यायला लागले आहे. ही दरवाढ २२ टक्के आहे. मुळात महाराष्ट्रात इतर सर्वच राज्याच्या तुलनेत वीज दर आधीपासूनच जास्त आहे. त्यात पुन्हा भर पडली आहे. सरकार, आयोग आणि महावितरणची ही अकार्यक्षमता आहे. याचा सामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
– प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ व अध्यक्ष- महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
गेल्या काही महिन्यांपासून वीज बिल मोठ्या प्रमाणात यायला लागले आहे. महागाईच्या या काळात महावितरणकडून आर्थिक लूट चालविली आहे. गरिबांनी वीज भरावे की घरचे बजेट सांभाळावे, असा प्रश्न आहे.
– गजानन कापसे, ग्राहक, त्रिमूर्तीनगर
https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq



