चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला; नागरिकांची पळापळ; जीवीतहानी नाही

चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा काही भाग आज सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेले आहेतत. त्यात आज सकाळी पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
उड्डाण पुलाचे काम वाशिष्ठी पुलाच्या बाजूने सुरु केले आहे. एकूण ४६ पिलर असताना त्यातील सहाव्या पिलर पर्यंतचे पूर्ण होत आले आहे. अशातच सोमवारी सकाळी पाचव्या पिलरच्या ठिकाणी असलेले गर्डर खचले. त्यामुळे परिसरात जोरदार आवाजही झाला. यावेळी काही नागरिकांची पळापळ झाली. पुलालगत असलेल्या इमारतीतील व्यापारी व रहिवाशांचीही धावाधाव झाली. या पुलाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनीही तेथुन पळ काढला. तूर्तास या पुलाचे काम थांबविण्यात आले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचं काम सुरु आहे. याआधी गर्डरमुळे महामार्गावर धोका निर्माण झाला होता. आता या पुलाचे बांधकाम सुरू असताना धोका निर्माण झालाय. काम सुरु असलेल्या पुलाच्या आतील सळ्या दिसू लागल्या आहेत. पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला असं तेथील काही नागरिकांनी म्हटलंय. घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.



