ताज्या घडामोडी

नमुंमपा पर्यावरण प्रयोगशाळेत पाणी गुणवत्ता तपासणीसाठी WQMS अत्याधुनिक कार्यप्रणाली कार्यान्वित

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा, पाणी व सांडपाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्याकरिता महानगरपालिकेची पर्यावरण प्रयोगशाळा कार्यरत असून या प्रयोगशाळेला आय.एस.ओ. 9001:2015 मानांकन प्राप्त आहे. या प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करीत ‘ई – प्रणाली पाणी नमुना तपासणी अहवाल व निरीक्षण प्रणाली’चे WQMS (Water Quality Monitoring System) अनावरण महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संपन्न झाले. शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.राजेश पवार, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाडे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे, प्रयोगशाळेचे मुख्य अधिकारी तथा उपअभियंता श्री.जितेंद्र रावळ आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी पर्यावरण प्रयोगशाळेची बारकाईने माहिती घेऊन नवीन कार्यप्रणालीचीही पाहणी केली. प्रयोगशाळा सुसज्ज असून त्याठिकाणी आयएसओ मानांकनानुसार कार्यप्रणाली राबविली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रयोगशाळेचा दर्जा आणखी उंचावण्याकरिता नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टींग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (NABL) यांची मान्यता प्राप्त करुन घेणेची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील खाद्यविक्रेते यांचेकडील नमुन्यांची चाचणी करण्याकरिता यंत्रणा उभारणे तसेच जलकुंभाच्या साईटवर आकस्मिकरित्या प्रयोगशाळा कर्मचारी यांनी भेट देऊन पाणी नमुना तपासणी करणे बाबतची आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.


सद्यस्थितीत येथे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पुरविण्यात येणा-या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात येतात तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तलाव, खाडी, नाले, मलप्रक्रिया केंद्रे, धारण तलाव (होल्डींग पाँड), विहिरी, लिचेट प्रक्रिया केंद्र, कुपनलिका (बोअरवेल ) इत्यादी ठिकाणचे सांडपाण्याचे नमुने तपासण्यात येतात. याशिवाय खाजगी संस्थांमार्फत तपासण्याच्या विनंतीसह दाखल करण्यात येणारे पिण्याच्या पाण्याचे तसेच सांडपाण्याचे नमुने प्रयोगशाळेमध्ये नियमितपणे तपासणी करण्यात येतात.

ही प्रयोगशाळा यापूर्वी आग्रोळी पुलाखाली असल्याने इथे काम करताना धूलीकणांपासुन होणा-या उपद्रवास सामोरे जावे लागत होते. त्यामुळे जुने बेलापूर विभाग कार्यालय असणा-या बेलापूरगाव येथील बहुउद्देशीय इमारतीमध्ये दुस-या मजल्यावर नवीन अद्ययावत पर्यावरण प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. या विद्यमान नुतन प्रयोगशाळेमध्ये ई – प्रणाली पाणी नमुना तपासणी अहवाल व निरीक्षण प्रणाली’ अंतर्गत विशेष डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

या प्रकल्पाव्दारे नमुना मागणीपासून चाचणी, मंजूरी आणि अंतिम अहवाल देण्यापर्यंतची संपूर्ण जल गुणवत्ता तपासणी प्रक्रिया, एकत्रित डिजिटल प्रणालीद्वारे सुलभ केली जाते.

जलपुरवठा, आरोग्य आणि वितरण विभागांसाठी नमुना संकलन व चाचणी प्रक्रिया अधिक सुसंघटित होते.

प्रत्येक पाण्याच्या नमुन्याची डिजिटल नोंद ठेवून पारदर्शकता व दूषित पाण्याच्या नमुन्यांचा पाठपुरावा घेण्याची क्षमता वाढते.

पुन्हा तपासणीसाठी स्वयंचलित सूचना व अलर्ट पाठविण्यात येतात आणि विभाग व नागरिकांसाठी डिजिटल स्वाक्षरीसहित ऑनलाइन रिपोर्ट उपलब्ध करून दिला जातो.

विशेष म्हणजे प्रशासनिक अधिकारी जल गुणवत्तेवर अचूक व तातडीने उपाययोजना करू शकतील असे जल तपासणी अहवाल सहज उपलब्ध करून देणे हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.

याशिवाय डेटा व डॅशबोर्डद्वारे समस्या ओळखणे, नमुने शोधणे व जलगुणवत्तेच्या सुधारित नियोजनासाठी सहाय्यक डेटा उपलब्ध करणे हे उद्दिष्टही साध्य होते.

या WQMS प्रकल्पांतर्गत संकेतस्थळ विकसित संकेतस्थळाव्दारे नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या जल तपासणी बाबत नागरिकांना माहिती देणे, जल गुणवत्ता निरीक्षणाचे महत्त्व आणि फायदे अधोरेखित करणे, खासगी नमुन्यांचे अहवाल ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देणे जेणेकरून नागरिक आपले जलतपासणी अहवाल पाहू शकतात व डाऊनलोडही करू शकतात तसेच NABL मानांकन प्राप्त करुन घेणे आणि अन्न सुरक्षाबाबत चाचणी करणे अशी विविध उद्दिष्ट्ये साध्य होऊ शकतात.

या ‘ई – प्रणाली पाणी नमुना तपासणी अहवाल व निरीक्षण प्रणाली’ अर्थात WQMS (Water Quality Monitoring System) या अद्ययावत प्रकल्पाव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी गुणवत्तेच्या तपासणीमध्ये अधिक अचूकता आणण्यासाठी आणखी एक यशस्वी पुढचे पाऊल उचललेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button