आरवली–बावनदी पट्ट्यात महामार्गावरील शोभेची झाडे सुकली; खर्च वाया, पर्यावरणावर परिणाम

संगमेश्वर :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गच्या चौपदरीकरणा दरम्यान आरवली ते बावनदी पट्ट्यात तसेच शास्त्री पूल ते तुरळ दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी लावण्यात आलेली शोभेची झाडे मोठ्या प्रमाणात सुकल्याचे चित्र समोर आले आहे. झाडे लावण्यासाठी करण्यात आलेला खर्च, मनुष्यबळ व वेळ वाया गेल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
चौपदरीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली होती. पर्यावरणीय भरपाई म्हणून मध्यभागी व कडेला झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी माती टाकण्याचे काम अपूर्ण राहिले, तर काही ठिकाणी झाडांची लागवडच झाली नाही. शास्त्री पूल ते धामणी रेल्वे स्थानक दरम्यान लावलेली काही झाडे देखील योग्य देखभाल न झाल्याने सुकून गेली आहेत.
रखडलेल्या कामांचा फटका
संगमेश्वर परिसरात चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. अपूर्ण कामांमुळे स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी व चाकरमानी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
संगमेश्वर पुनर्वसन ते ओझरखोल दरम्यान एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने हॉटेल व्यावसायिक व स्थानिक दुकानदारांचे उत्पन्न घटले आहे. ग्राहकांची संख्या कमी झाल्याने व्यापार ठप्प झाल्याची तक्रार व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे
वृक्षतोडीमुळे हजारो पक्ष्यांची निवासस्थाने नष्ट झाली असून पक्षी बेघर झाले आहेत. नव्याने लावलेली झाडेही सुकल्याने पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
लावलेली झाडे का सुकली? त्यांची देखभाल का झाली नाही? विनापरवाना वृक्षतोडीची चौकशी होणार का अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी नागरिकांकडून होत असून बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने झाडांची पुनर्लागवड, नियमित पाणीपुरवठा व चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.



