आमदार सदाभाऊ खोत यांच्या पाठपुराव्याला यश; अजिवली–पाचल–डोंबिवली– कल्याण मार्गावर विशेष एस.टी. सेवा सुरू

मुंबई:- येरडव–मुंबई दिवसा धावणारी गाडी पूर्ववत सुरू करणे तसेच पाचल–डोंबिवली–कल्याण आणि पुणे–अक्कलकोट या मार्गांवर एस.टी. सेवा सुरू करण्याबाबत मा. आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन करताच तात्काळ बस सेवा सुरू करण्यात आली.
राजापूर तालुक्यातील येरडव–मुंबई या मार्गावर दिवसा धावणारी एकमेव एस.टी. गाडी बंद असल्यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. कामानिमित्त, शैक्षणिक तसेच वैद्यकीय कारणांसाठी दररोज मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.
सध्या शिमगोत्सव (होळी उत्सव) सुरू असल्याने गावाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे अजिवली–मुंबई ही दिवसा धावणारी गाडी तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी मा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी मा. आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते. सदर मागणी पाचल व्यापारी संघटनेकडून देखील करण्यात आली होती.
तसेच राजापूर तालुक्यातील पाचल विभागातून डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथे वास्तव्यास असलेले अनेक ग्रामस्थ नियमित प्रवास करतात. मात्र पाचल येथून कल्याणकडे जाणारी थेट एस.टी. सेवा उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे राजापूर आगारामार्फत पाचल–डोंबिवली–कल्याण अशी नवीन एस.टी. बस सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच पुणे–अक्कलकोट या मार्गावरही एस.टी. सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनानंतर होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली. मा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार अजिवली – कल्याण– डोंबिवली– विठ्ठलवाडी ही विशेष एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.



