छत्रपती शाहूनगरी कोल्हापूरात देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच चे शानदार उद्घाटन

कोल्हापूर- राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर बेंचची निर्मिती होत आहे. ही न्याय व्यवस्था वकिलांसाठी नव्हे, तर गोरगरीबांसाठी उपलब्ध होत आहे. याठिकाणी शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे समानतेचे न्यायदान करा, असे आवाहन करतानाच सर्किट बेंच तयार झाले आहे. आता खंडपीठ उभारणीसाठी उच्च न्यायालयाने प्रस्ताव सादर करावा, ती मागणीही लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारतीच्या उद्घाटनानंतर येथील मेरी वेदर क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
खंडपीठाच्या या ४३ वर्षांच्या लढ्यामध्ये गत २५ वर्षांपासून आपण स्वतः सहभागी आहोत. मुख्यमंत्री फडणवीस हे २०१४ पासून या लढ्यात आहेत. न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी माझा नेहमीच आग्रह राहिला आहे. त्यामुळे अगदी कमी वेळेत हा निर्णय उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या वतीने प्रत्यक्षात आला आहे. आज तो शब्द खरा होत असल्याचा आनंद होत आहे. पद हे अधिकार दाखवण्यासाठी नाही, तर समाजातील वंचितांच्या भल्यासाठी वापरण्याची आपल्या वडिलांची शिकवण होती. माझ्या नियुक्तीनंतर नियतीने ही संधी दिली आहे.
शाहू महाराजांच्या कर्तृत्वाच्या भूमीत त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाला न्याय देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झालेल्या दिवसाप्रमाणे आजचे क्षण आनंददायी आहेत.भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना सर्वांना समान न्यायाची अपेक्षा करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, भारतात लोकशाही बळकट होण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण होणे आवश्यक आहे. पक्षकारांना मुंबई हे ठिकाण दूर पडत होते. त्यामुळे कोल्हापूर येथे निर्माण होणारे सर्किट बेंच हे दुर्गम भागातील वंचितांना न्याय देणारा मैलाचा दगड ठरावा, यासाठी बेंचच्या न्यायप्रक्रियेतील सर्वांनी प्रत्यक्ष योगदान द्यावे – सरन्यायाधीश भूषण गवई
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच उद्यापासून सुरू होत आहे, हा ऐतिहासिक क्षण असून यामुळे कोल्हापूरसाठी विकासाचे दालन खुले झाले आहे. या निर्णयामध्ये खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला मिळाले आहे. खरे तर या बेंचचे शिल्पकार सरन्यायाधीश भूषण गवई हेच आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि केवळ सर्किट बेंचची मंजुरीच नाही, तर उद्घाटनाची तारीखदेखील त्यांनीच ठरवली. त्यांचा पाठपुरावा प्रचंड होता. त्यामुळे बेंचच्या निर्मितीचे श्रेय त्यांना द्यायला हवे. शेंडा पार्क येथील ६८ कोटी रुपयांच्या २५ एकर जमिनीचे हस्तांतरण उच्च न्यायालयासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावी. कोल्हापूरच्या नावलौकिकाला साजेशी इमारत राज्य शासन उभी करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची भूमिका कोल्हापुरात मांडून देशाला समानतेचा संदेश दिला होता. त्याच कोल्हापुरात फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा जोपासणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मार्गदर्शनात सर्किट बेंच स्थापन होत आहे. सामाजिक न्यायाचा परिघ विस्तारत आहे. या घटनेने सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण होत आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, जैन अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सतेज पाटील, जयंत आसगावकर, अरुण लाड, विश्वजित कदम, राजेद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक, अशोकराव माने, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, गोपीचंद पडळकर, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवळे आदी उपस्थित होते.



