देशसेवक ते लोकसेवक ; माजी सैनिक राजेंद्र शिर्के ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणूकीत देशसेवक म्हणून काम केलेले माजी सैनिक राजेंद्र बळवंत शिर्के यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजेंद्र शिर्के यांनी सैन्यदलात तब्बल १५ वर्षे ९ महिने ५ दिवस आपली सेवा बजावली आहे. लान्स नाईक पदावरुन निवृत्त होत त्यांनी गावच्या विकासाचा वसा धरत लोकाभिमुख कामे करायला सुरुवात केली. निःस्वार्थ भावनेने काम करत असलेले राजेंद्र शिर्के यांनी पहील्यांदाच राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत सरपंच पदाचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. देशसेवक ते लोकसेवक असा प्रवास करत असताना आपल्याला जनतेचा उस्फुर्त पाठींबा मिळत असल्याचे राजेंद्र शिर्के यांनी यावेळी सांगितले आहे.
राजिवली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली होती या निवडणुकीत प्रशांत शिर्के विरुद्ध संतोष येडगे अशी थेट लढत झाली होती या निवडणुकीत प्रशांत शिर्के विजयी होत सरपंच पदावर बसले होते मात्र ११ मे २०२३ रोजी सरपंच प्रशांत शिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यावर तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त यांनी २६ सप्टेंबर २०२३ रोजी अपात्रतेची कारवाई करत ४ महीने २४ दिवसांत सरपंच पदावरुन काढून टाकले होते. २६ सप्टेंबर २०२३ ते ३० मार्च २०२६ पर्यंत राजिवली ग्रामपंचायत सरपंच पद रिक्त होते येथील सरपंच पदाचा पदभार उपसरपंच दिपीका सावंत यांच्याकडे देण्यात आला होता. ३० मार्च २०२६ रोजी निवडणूक विभागाने राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर केल्यानंतर सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात येत आहेत.
राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक अर्ज दाखल करण्याचा दिनांक ७ एप्रिल ते १३ एप्रिल असून अर्ज छाननी १५ एप्रिल २०२६ असणार आहे तर अर्ज मागे घेण्याची मुदत १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ ते ५.३० पर्यंत तीन प्रभागातील मतदान केंद्रावर पार पडणार आहे.



