जनकेंद्रित, AI सक्षम आणि सायबर स्मार्ट महाराष्ट्र पोलीस उभारण्यासाठी दरमहा आढावा बैठक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका

मुंबई – राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस दलाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या विषयांवर दरमहा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टिम (ICJS), पोलीस दलाचे आधुनिकीकरण, विशेष गुन्हे तपास पथकांचे सक्षमीकरण, किनारपट्टी सुरक्षा, अंमली पदार्थांविरोधातील प्रभावी कारवाई, पोलीस प्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर तसेच पोलीस कल्याण व आरोग्य यांसारख्या विषयांवर नियमित आढावा घेऊन जलद आणि प्रभावी निर्णय घेण्यावर भर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचे “जनकेंद्रित, सुलभ, उत्तरदायी, भविष्यासाठी सज्ज, तंत्रज्ञान व AI सक्षम आणि सायबर स्मार्ट महाराष्ट्र पोलीस” हे स्वप्न साकार करण्यासाठी शासन आणि महाराष्ट्र पोलीस दल एकत्रितपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.

या मालिकेतील तिसरी आढावा बैठक आज महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या ऐतिहासिक (हेरिटेज) इमारतीत अपर मुख्य सचिव (गृह) मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पोलीस दलाच्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, सायबर गुन्हे नियंत्रणासाठी, तंत्रज्ञानाधारित तपास यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणि आधुनिक, सक्षम व उत्तरदायी पोलीस व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णयांवर चर्चा करण्यात आली.



