प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीची आयुक्त रुबल अगरवाल यांच्याकडून पाहणी
चिपळूणच्या विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा; ‘मलाही शिक्षिका व्हायचं होतं…’ म्हणत विद्यार्थिनींशी साधला हृद्य संवाद

चिपळूण : प्रशासकीय कार्यक्षमता, विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, पर्यावरण संवर्धनाचा ध्यास आणि शाळकरी मुलींशी साधलेला आत्मीय संवाद अशा बहुआयामी उपक्रमांनी कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांचा चिपळूण दौरा बुधवारी लक्षवेधी ठरला. पूरनियंत्रण, पर्यावरण संवर्धन, पारदर्शक भूसंपादन तसेच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामात चिपळूण उपविभागीय प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कामाचे आयुक्तांनी कौतुक केले.
उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि अर्चना बोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पूरनियंत्रणापासून पारदर्शक भूसंपादनापर्यंत कामांचा आढावा
या बैठकीत प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे चिपळूणच्या विकासाचा आणि प्रशासनाच्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. सन २०२१ मधील महापुरानंतर प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता भविष्यातील पूरस्थितीचा विचार करून केलेल्या ठोस उपाययोजना, प्रभावी संदेशवहन यंत्रणा, नद्यांमधील गाळ उपसा अभियान, प्लॅस्टिकमुक्तीचा निर्धार तसेच ‘एका क्लिकवर भूसंपादन मोबदला’ या पारदर्शक उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमांची दखल घेत आयुक्त अगरवाल यांनी चिपळूण प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. दूरदृष्टीने आखलेले नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी यामुळे प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो, असे त्यांनी नमूद केले.
‘मलाही शिक्षिका व्हायचं होतं…’; विद्यार्थिनींशी हृद्य संवाद
कोंडमळा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा क्रमांक १ मधील मतदान केंद्रांची पाहणी करताना आयुक्त अगरवाल यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचीही झलक पाहायला मिळाली.
शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी सहजपणे, “मोठं होऊन काय व्हायचंय?” असा प्रश्न विचारला. त्यावर मुलींनी डॉक्टर, गायिका, शिक्षिका होण्याची स्वप्ने उत्स्फूर्तपणे सांगितली. विद्यार्थिनींच्या या निरागस उत्तरांवर आयुक्त अगरवाल यांनी “मलाही लहानपणी शिक्षिकाच व्हायचं होतं…” अशी भावना व्यक्त करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
या संवादामुळे शाळेतील वातावरण काही क्षण भावूक झाले. मतदान केंद्राची पाहणी करण्याबरोबरच त्यांनी शाळेतील विविध सुविधांची, विशेषतः स्वच्छतागृहांची उपलब्धता व स्थितीची माहिती घेतली.
यावेळी मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामात उत्कृष्ट योगदान देणारे बीएलओ एस. एस. मालगुंडकर आणि के. एस. खापरे यांचे आयुक्तांनी विशेष कौतुक केले.
देवराईतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
आयुक्तांनी कळंबस्ते येथील निसर्गसंपन्न देवराईला भेट देऊन स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व जाणून घेतले. देवराईसारख्या पारंपरिक निसर्गसंवर्धनाच्या ठिकाणांचे जतन करणे ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर पुढील पिढ्यांप्रतीची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर त्यांनी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता’ योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाची पाहणी करून शेतकऱ्यांना उपलब्ध झालेल्या दळणवळण सुविधेचा आढावा घेतला.
घरकुल लाभार्थ्यांशी थेट संवाद
कोंडमळा ग्रामपंचायतीला भेट देत आयुक्तांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची प्रत्यक्ष पाहणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधून घरकुल योजनेचा लाभ मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलांची माहिती घेतली. शासकीय योजनांचा लाभ खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे की नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यावर त्यांनी भर दिला.
‘मतदार यादीत आपले नाव तपासा’
चिपळूण नगरपरिषदेला भेट देऊन आयुक्त अगरवाल यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ३० सप्टेंबरपर्यंत दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव तपासावे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६, तर मतदार यादीतील दुरुस्ती अथवा आवश्यक बदलांसाठी अर्ज क्रमांक ८ भरावा, असे आवाहन आयुक्त रुबल अगरवाल यांनी केले.
लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदारांनी केवळ मतदानाच्या दिवशीच नव्हे, तर मतदार यादीच्या पुनरिक्षण प्रक्रियेतही सजगपणे सहभागी होणे आवश्यक आहे, असा संदेश देत आयुक्तांनी नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.



