महाराष्ट्राच्या प्रशासनाची धुरा मनीषा म्हैस्कर यांच्या हाती जाणार?
राजेश अग्रवाल यांच्यानंतर मुख्य सचिवपदासाठी म्हैस्कर यांच्या नावाची जोरदार चर्चा; १ डिसेंबरपासून सूत्रे स्वीकारण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात पुढील मुख्य सचिव कोण होणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यानंतर राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय पदाची जबाबदारी मनीषा म्हैस्कर यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
१ डिसेंबर रोजी म्हैस्कर मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारू शकतात, अशी शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
१९९२च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या मनीषा म्हैस्कर यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे मुख्य सचिवपदाच्या संभाव्य नावांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
अंतिम निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाणार असून, अधिकृत आदेशानंतरच महाराष्ट्राच्या पुढील मुख्य सचिवपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे.



