‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व नागरिकांची गैरसोय होऊ नये – कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

नवी मुंबई – ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर आयोजित ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा विभागीय कार्यालयात घेण्यात आला.
बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, फायर ऑडिट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी निवास आदी बाबींवर सविस्तर चर्चा झाली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या, विद्यार्थी-युवकांचा सहभाग, निबंध-चित्रकला-वक्तृत्व स्पर्धा तसेच माहितीपट व गीत सादरीकरणाचे आयोजन करण्यात येत आहे.
“हा ऐतिहासिक कार्यक्रम सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि त्याग-शौर्याच्या संदेशाचा प्रसार करणारा ठरेल,” असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.



