पाचंबे नेरदवाडीत बिबट्याचा रेड्यावर हल्ला; हल्ल्यात रेडा ठार तर म्हैस गंभीर जखमी.

संगमेश्वर: तालुक्यातील पाचांबे नेरदवाडीत बिबट्याने राजाराम झोरे यांच्या रेड्यावर हल्ला केला या हल्ल्यात रेडा जागीच ठार झाला तर म्हैस गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नेरदवाडी वस्तीजवळच घडली आहे. ही घटना बुधवारी ११ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता घडली घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परीसरात सातत्याने बिबट्या फिरत असल्याचे दिसून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये चिंतेची भावना आहे. या घटनेची माहिती भरत झोरे यांनी वनपाल सागर गोसावी आंनि पोलीस पाटील राकेश सुर्वे यांना देताच वनपाल यांच्या आदेशानुसार पोलीस पाटील राकेश सुर्वे व वनविभागाचे वनरक्षक सुरज तेली यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.
गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनपाल सागर गोसावी यांच्याकडून करण्यात आले आहे. विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळी एकट्याने बाहेर जाणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच गुरे-वासरे संध्याकाळनंतर सुरक्षित गोठ्यात बांधून ठेवावीत, असेही सांगण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.



