आपला जिल्हा

महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग सदस्यांच्या जिल्हा दौऱ्यात सुनावण्या पूर्ण

बालहक्क आयोग आपल्या दारी उपक्रमातून न्याय देण्याचा प्रयत्न

रत्नागिरी, दि. २८ अर्धन्यायिक दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे व ॲड. संजय सेंगर यांचा जिल्हा दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यादरम्यान आयोगाच्या सदस्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सुनावण्या येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात घेतल्या. शैक्षणिक, पोक्सो ॲक्ट आदी प्रकरणे सुनावणीसाठी आयोगासमोर आली होती. १० प्रकरणांपैकी ३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

दौऱ्यादरम्यान आयोगाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचीही भेट घेऊन जिल्ह्यातील बालकल्याण संबंधित विविध योजना व प्रश्न यावर चर्चा केली. यानंतर सदस्यांनी जिल्हा बालकल्याण समितीच्या कार्यालयास भेट देऊन समिती सदस्यांशी चर्चा केली. तसेच शहरातील शासकीय बालगृह व निरीक्षणगृहाला देखील भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

या दौऱ्यादरम्यान आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले, “रत्नागिरी जिल्ह्यातील बालकांशी संबंधित प्रश्न येथील प्रशासन योग्य प्रकारे हाताळत असून, इतर भागाच्या तुलनेत येथील कामकाज समाधानकारक आहे. ‘आयोग आपल्या दारी’ या उपक्रमातून आयोग अधिक लोकाभिमुख व्हावा यादृष्टीने आयोगाने रत्नागिरी जिल्ह्यात सुनावण्या घेऊन पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदार तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना प्रत्येक वेळी दूरवरचा प्रवास करुन आयोगाच्या मुंबई येथील मुख्यालयात सुनावणी साठी हजर राहणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात. ही अडचण लक्षात घेऊन आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आयोगाचे सदस्य संबंधित ठिकाणी पोहचून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. तसेच यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाशी देखील बालकल्याण विषयाशी संबंधित चर्चा व विचारविनीमय होतो”. या दौऱ्यादरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, जिल्हा परिविक्षा अधिकारी अनिल माळी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button