गांजा प्रकरणी गोवळकोट येथून एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

चिपळूण – गोवळकोट येथील एका तरुणाला पनवेल पोलिसांनी एक किलो गांजासह ताब्यात घेतले आहे. त्याचे चार चाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. या घटनेने चिपळूण शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या उद्रेकानंतरही चिपळूणमध्ये गांजा विक्री होत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबईहून चिपळूणमध्ये गांजा विक्रीसाठी येत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान चिपळूण पोलीस अलर्ट मोडवर असून शहराचा कानाकोपरा ते शोधून काढीत आहेत. चिपळूण शहरात गांजा व चरसची खरेदी विक्री करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असताना पनवेल पोलीसांनी धडक कारवाई करून एकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुळचा गुजरातचा रहिवासी असलेला एक तरुण गोवळकोट रोड येथे काही वर्षापासून वाहने दुरुस्त करण्याचे काम करतो. सोमवारी दुकान बंद ठेवून तो रविवारी साहित्य खरेदीसाठी मुंबईला जातो.
येताना तो वाहनांच्या सुट्या पार्टसह अमली पदार्थ आणतो आणि चिपळूण मधील पान टपरी वाल्याना पुरवतो. मागील काही दिवसापासून चिपळूण शहरांमध्ये अमली पदार्थचे विक्री आणि सेवन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.



