धनगर, मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावावे आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संगमेश्वर – राज्यात सध्या मराठा आणि धनगर आरक्षणाचा विषय पेटला असून मराठा आणि धनगर समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. मराठा आणि धनगर समाजाला जातीच्या आधारे आरक्षण देण्याच्या विषयासाठी चिपळूण संगमेश्वर – विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मराठा आणि धनगर आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.
मराठा आणि धनगर आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले असून आंदोलन उग्र रुप धारण करु लागले आहे. मराठा समाजाच्या समर्थनार्थ खासदार हेमंत गोडसे, हिंगोली चे खासदार हेमंत पाटील, बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपले राजिनामा दिले आहेत. आरक्षण विषयी राजिनामा सत्र सुरु झाले असून विद्यमान सरकारला धक्के बसू लागले आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला करत आंदोलनाची दिशा स्पष्ट केलेली होती.
मराठा व धनगर आरक्षणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत असून सरपंच चे खासदार पर्यंत जनतेच्या सहानुभूतीसाठी राजिनामा देवून थेट आंदोलकांमध्ये सामील होण्यास तयार झाले आहेत. विद्यमान सरकारबद्दल जनतेत प्रचंड रोष दिसून येत असून या विषयी राज्य सरकारने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून मराठा आणि धनगर आरक्षणाने चर्चा करुन मार्ग काढणे आवश्यक असल्याचे मत या पत्रातून आमदार शेखर निकम यांनी मांडले आहे.



