ताज्या घडामोडी

उत्तन-विरार सागरी मार्ग वाढवण बंदरला जोडणार!

मुंबई : सुमारे ५२ हजार ६५२ कोटी रुपये खर्चाच्या उत्तन-विरार सागरी मार्गाला (यूव्हीएसएल) गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. हा प्रकल्प वाढवण बंदर व समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा, असे आदेशही फडणवीस यांनी दिले. उत्तन-विरार सागरी मार्गाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(एमएमआाराडीए) तयार केलेला सुधारित आराखडा आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते. मुखर्जी यांनी सादरीकरणाद्वारे या प्रकल्पाची माहिती दिली.

एमएमआरडीएने या प्रकल्पाचे सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन करुन सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रकल्प रचनेचे ८७ हजार ४२७ कोटी रुपयांपासून ते ५२ हजार६५२ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे सहा वेगवेगळे पर्याय सादर केले. त्यातून आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक असलेला ५२ हजार६५२ कोटी रुपयांच्या पर्यायाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निवड केली. या पर्यायामुळे प्रकल्पाचा खर्च मुळ ८७ हजार४२७ कोटींवरून ५२ हजार ६५२ कोटींवर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे ३४ हजार ७७५ कोटींची बचत होणार आहे.

उत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) तयार करावे. प्रस्तावित मार्गाला आवश्यक मंजुरीची प्रक्रिया वेगाने करावी, असे आदेश फडणवीस यांनी यावेळी दिले.

  • असा आहे प्रकल्प :
  • एकूण लांबी : ५५.१२ किमी
  • मुख्य सागरी मार्ग: २४.३५ किमी
  • कनेक्टर्स : ३०.७७ किमी
  • उत्तन कनेक्टर (९.३२ किमी) – बृहन्मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोडशी जोड
  • वसई कनेक्टर (२.५ किमी) – पूर्णपणे उन्नत * विरार कनेक्टर (१८.९५ किमी) – वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेला जोडणार

Related Articles

Leave a Reply

Back to top button