आपला जिल्हा

राजेंद्र निकम यांचे आदर्श काम! स्वखर्चातून भावकीतील १८ कुटुंबांना दिला मायेचा निवारा; रुढी,परंपरा टिकवण्यासाठी भावकीचे ऐक्य

संगमेश्वर – तालुक्यातील पाचांबे गावचे सुपुत्र सध्या चारकोप, कांदिवली मुंबई या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्री.राजेंद्र उर्फ राजन निकम यांनी आपल्या भावकीच्या ऐक्यासाठी आणि भावकीतील रुढी, परंपरा टिकून रहाव्यात या साठी भावकीला एकत्र करुन विस्थापित १८ कुटुंबांना स्वखर्चाने तब्बल २२ लाख रुपये खर्च करुन मायेचा निवारा करुन दिला आहे.श्री. राजेंद्र निकम यांनी पाचांबे या त्यांच्या मुळ गावी १८ कुटुंबांसाठी बांधलेल्या घरांची ३१ जानेवारी २०२५ रोजी वास्तुशांती करुन त्या घरांच्या चाव्या भावकीच्सा स्वाधीन करत आदर्शाचा पायंडा घालून दिला.

राजेंद्र निकम हे पाचांबे सारख्या सह्याद्री पट्ट्यातील दुर्गम गावातून मुंबईत विस्थापित झाले मात्र त्यांची गावाकडील ओढ कधीच कमी झाली नाही त्यांनी त्यांच्या भावकीप्रती आदर कायम टिकवून ठेवला. गावातील प्रत्येक सणाला ते भावकीत येवून आनंदाने सर्व भावकीसोबत सण साजरे करत असतात. पुढील पिढीने रुढी, परंपरा टिकवून ठेवाव्यात हा त्यांचा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

राजेंद्र निकम यांचा राजकीय प्रवास मुंबईत सुरु झाला त्यांनी मुंबईत शिवसेना पक्षात गट प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभागप्रमुख, विभागप्रमुख आणि सध्या ते शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे चारकोप विधानसभा संघटक या पदावर लोकाभिमुख कामे केल्याची त्या ठिकाणी मान्यता आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली मायेची घरे हे फक्त काम नव्हे तर हा एक उत्तम पायंडा असल्याची भावना त्यांच्या भावकीतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button