येडगेवाडी जलजीवन मिशन नळपाणी योजनेच्या लोकसंख्येत संभ्रम ; राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तीनही गावातील योजना अपयशाच्या मार्गावर.

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी या ठिकाणी तब्बल १ कोटी ३७ लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी लोकसंख्येचा निकष लावण्यात आला आहे. येडगेवाडीतील ग्रामस्थांनी राजिवली ग्रामपंचायतीला दिलेल्या वेगवेगळ्या निवेदनात एकूण ६४४ लोकसंख्या दाखविली आहे. या प्रत्यक्ष लोकसंख्येला लाभ मिळावा असे निवेदन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिलेले असताना पाणी पुरवठा विभागाने ॲानलाईन डेटा लक्षात घेवून ३६२ लोकसंख्येचा निकष लावत योजना राबविण्याचे ठरवले आहे. ६४४ लोकसंख्येपैकी ३६२ लोकसंख्या ग्राह्य धरल्याने २८२ लोकसंख्या या योजनेपायून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषानुसार प्रत्येकी ५५ लिटर पाणी देय आहे. ६४४ लोकसंख्येचा विचार केला तर येडगेवाडीला संकल्पित लोकसंख्येनुसार दररोज साधारण ७० हजार लिटर पाणी उपसा उद्दिष्ट अपेक्षित आहे मात्र सध्याच्या स्थितीत येडगेवाडीत असणा-या पाणी स्त्रोतांमधून ३२ हजार लिटर पाणी उपसा आहे त्यापैकी साधारण २० हजार लिटर पाणी पंपाने उपसा करण्यायोग्य असल्याचे मत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दैनंदिन मागणीनुसार ५० हजार लिटर पाण्याची तफावत असल्याने येडगेवाडीचे पाणी टंचाईचे संकट दुर होईल याची शक्यता कमी आहे. आणि योजना अपयशी होण्याची शक्यता मांडण्यात येत आहे.
राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील राजिवली, रातांबी, कुटगिरी या तीनही गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झालेल्या आहेत. रातांबी येथील नळपाणी योजनेतील विहीरीला पाणी नसल्याने कोरडे नळ गावक-यांच्या वाट्याला येत आहेत. तर राजिवली गावासाठी मंजूर असलेल्या योजनेतील विहिरीला पाणीच लागले नाही. रत्नागिरी भूवैज्ञानिक विभाग जि.प रत्नागिरी यांनी सांगितलेल्या ठिकाणी विहीरींना मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने भूवैज्ञानिक जि.प रत्नागिरी विेबागाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तीनही गावातील नळपाणी योजना अपयशी होत आहेत. अपयशाचे खापर कोणाच्या डोक्यावर फुटणार ग्रामीण पाणीपुरवठा विबागाच्या की भूजल सर्वेक्षण विभागाच्या हा प्रश्न उपस्थित होत आहे.



