आपला जिल्हा

चिपळूण नागरीने २ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा गाठून सहकारात नाव उंचावले- एस. बी. पाटील

सहकार मेळावा व कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; “हर घर तिरंगा' अभियानात सहभाग देणारी चिपळूण नागरी एकमेव पतसंस्था

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने २ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठून सहकारात नाव उंचावले आहे, ही बाब अभिमानास्पद असून यामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा ध्यास, कल्पकता आहे, अशा शब्दांत कौतुक करताना चिपळूण नागरीसह वाशिष्ठी डेअरीची उत्तरोत्तर प्रगती व्होवो, अशी सदिच्छा सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईचे एस. बी. पाटील यांनी चिपळूण नागरीच्या सहकार मेळावा व कार्यशाळा प्रसंगी व्यक्त केली.

हा मेळावा चिपळूण बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या सहकार भवन सभागृहात झाला. यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, संचालक अशोक कदम, सोमा गुडेकर, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी, प्रकाश पत्की, सत्यवान म्हामुनकर, राजेंद्र पटवर्धन, संचालिका श्रीमती नीलिमा जगताप, एडवोकेट नयना पवार आदी उपस्थित होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक व्यावसायिकता संभाळताना सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. तसेच कायदेशीर मार्गे वसुली हा पर्याय नाही कर्जदारांमध्ये इच्छाशक्ती असेल तर वसुली होऊन जाते. या संस्थेने वसुली पथकाची कधी गाडी फिरवली नाही. स्वतंत्र यंत्रणा राबवली नाही. सभासदांच्या मनात आपण कर्ज घेतले की हप्ते फेडले पाहिजेत, अशी भावना निर्माण केल्याने या संस्थेची कर्ज वसुली उत्तम आहे. तर संस्थेच्या ठेवीदेखील दिवसेंदिवस वाढत आहे चिपळूण नागरी आणि सभासदांचे नाते वेगळे आहे. “आपली माणसं आपली संस्था” या ब्रीदवाक्यप्रमाणे या संस्थेची यशस्वीपणे वाटचाल सुरू असून चिपळूण नागरी बरोबरच वाशिष्ठी डेअरीची वाटचाल कौतुकास्पद असून चिपळूण नागरी -सहकार व वाशिष्ठी डेअरी- खाजगी याची उत्तम सांगड घालण्यात आली असून या दोन्हींची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त केली.

चिपळूण नागरीच्या सिईओ सौ. स्वप्ना यादव रणरागिणी-तानाजी कवडे

माजी सहनिबंधक लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य पुणेचे तानाजी कवडे यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरीच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. यामध्ये चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. संस्था वाढवायची असेल तर फक्त संचालकांचा सहभाग असून चालत नाही. त्यामागे त्या संस्थेच्या सीईओंचे महत्त्वाचे योगदान असते. सहकारामध्ये असे म्हटले जाते की, संस्थेचा संचालक हा संस्थेचा मेंदू आहे. तर सीईओ हा संस्थेचा कणा आहे. चिपळूण नागरीमध्ये एक रणरागिणी आहे. ती संस्थेचा यशस्वीपणे कारभार पाहत आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व असल्याशिवाय कुठलेही कामकाज धडाडीने करता येत नाही, सिईओला अनेक जबाबदाऱ्या संभाळाव्या लागतात. त्या साऱ्या जबाबदाऱ्या या संस्थेच्या सीईओ यशस्वीपणे सांभाळीत आहेत, अशा शब्दात चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांचे कौतुक करताच उपस्थितीतांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच वाशिष्ठी डेअरीच्या वाटचालीचे देखील कवडे यांनी कौतुक केले.

२ हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याचा अभिमान-सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतात संस्थेने आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असा २ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. भविष्यात देखील आपली साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना चिपळूण नागरीच्या २०२८ च्या संकल्पित आराखड्याचा आढावा घेतला. या आराखड्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. तसेच वाशिष्ठी डेअरीची अल्पावधीतच यशस्वी वाटचाल सुरू असून यातून जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत श्री. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त करतांना चिपळूण नागरी- वाशिष्ठी डेअरी आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचं आहे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करूया, असे आवाहन उपस्थितीतांना केले.

या सहकार मेळावा व कार्यशाळेचे सूत्रसंचालन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी करताना चिपळूण नागरीच्या वाटचालीचा आढावा घेतला. वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह, लियाकत कासकर, सीताराम तटकरे, सीताराम खेतले, विलास कदम, नाना शिर्के, वैभव चव्हाण, गणपतराव शिंदे, गजानन भोसले आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

या मेळाव्यात ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व समन्वयक सभासद व उपस्थितीतांना तिरंगा देऊन “हर घर तिरंगा” अभियानात सहभाग देणारी चिपळूण नागरी एकमेव पतसंस्था ठरली आहे. विशेष म्हणजे या तिरंग्याचे अनावरण करून उपस्थितीतांनी ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button