चिपळूण नागरी पतसंस्था व वाशिष्ठी डेअरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील- सौ. स्वप्ना यादव
खेर्डी येथील महिला बचत गट सक्षमीकरण व रोजगार निर्मिती कार्यक्रमात महिलांना दिली ग्वाही

चिपळूण – कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एखादी महिला सक्षमपणे उभी राहिली ती व्यवसायात चांगली पुढे आली तर नक्कीच एक कुटुंब उभं राहतं. कुटुंबाला आधार होतो. तुम्ही पुढे यायला पाहिजे. तुम्ही जिद्द ठेवा, कष्ट करण्याची हिम्मत ठेवा, चिपळूण नागरी पतसंस्था व वाशिष्ठी डेअरी तुम्हाला हात देईल, अशी ग्वाही चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी खेर्डी येथे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांच्या संकल्पनेतून महिला बचतगट सक्षमीकरण व रोजगार निर्मिती कार्यक्रमाप्रसंगी महिलांना ग्वाही दिली.
हा कार्यक्रम खेर्डी येथील संस्कृती सभागृहात शुक्रवारी झाला. यावेळी व्यासपीठावर खेर्डीच्या सरपंच सौ. अश्विनी पंडित, उपसरपंच सौ. सुप्रिया उतेकर, सदस्या सौ. सुगंधा माळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. राधा शिंदे, शहराध्यक्षा सौ. डॉ. रेहमत जबले, कार्याध्यक्षा सौ. अंजली कदम, उबाठा महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ. दीप्ती सावंतदेसाई, भिले सरपंच सौ. आदिती गुढेकर, माजी नगरसेविका सौ. सीमा चाळके, चिपळूण अर्बन बँकेच्या माजी संचालिका सौ. छाया खातू आदी उपस्थित होत्या. यावेळी खेर्डीमधील महिला बचतगट, ग्रामपंचायत सीआरपी प्रतिनिधी यांचा वाशिष्ठी डेअरी तर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी सौ. स्वप्ना यादव पुढे म्हणाल्या की, चिपळूण नागरीच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो. यातून उद्योजक निर्माण झाले आहेत. यानंतर संस्थेने २००८ पासून शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात केली. शेतकरी देखील उभे राहत असल्याचे पहावयास मिळत आहे. तर आता महिला देखील स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत, अशी आमची भावना आहे. त्यामुळे महिलांसाठी गृहलक्ष्मी कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे. या कर्जातून महिला व्यवसायिक दृष्ट्या सक्षम होतील असा, आम्हाला विश्वास आहे. महिला बचतगटांना देखील आम्ही व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात केलेली आहे, यासाठी महिलांनी पुढे यायला पाहिजे, असे सौ. स्वप्ना यादव यांनी यावेळी आवाहन केले.
वाशिष्ठीच्या शॉपी महिला बचतगटांना चालवण्यास देण्याचा आमचा मानस
चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी डेअरी उभी राहिली आहे. या डेअरीच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. आम्ही काही शॉपी चालवत आहोत. तर काही शॉपी चालवण्यास दिल्या गेल्या आहेत. महिला बचतगट पुढे आल्यास वाशिष्ठी डेअरीच्या शॉपी चालवण्यास देण्याचा आमचा विचार आहे, असे त्यांनी महिलांना दिलासा दिला. तर वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी दिनी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता असे सांगून महिला बचतगटांच्या भाजीपाला व इतर उत्पादने विक्रीसाठी इमारत उभारणीसाठी प्रशांत यादव यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सौ. स्वप्ना यादव यांनी यावेळी सांगितले.
तुमच्या आशीर्वादाची गरज
शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने प्रशांत यादव यांना पुढे जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. तुम्हाला आम्ही साथ देतोय तशी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमचा हात त्यांच्या पाठीशी कायम राहू दे, असे आवाहन करताना तुमची कोणतीही अडचण असेल तर कधीही मला हाक मारा, आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली.
वाशिष्ठी डेअरी कोकणात दीपस्तंभ ठरणार!
जिद्द व कष्ट करण्याची हिम्मत असेल तर ते काय होतं त्याचं उत्तम उदाहरण वाशिष्ठी डेअरी ही आहे. पुढच्या कालखंडात एक दीपस्तंभ म्हणून वाशिष्ठी डेअरी आपल्या कोकणात उभी राहील असा विश्वास, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी चिपळूण नागरीच्या संचालिका एडवोकेट नयना पवार यांनी देखील आपले मनोगत मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली. या कार्यक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सौ. सावित्री दुबे, सौ. अनिता चोरगे, सौ. मीना फाळके, सौ. स्वरा शिंदे, सौ. गीता फाळके, सौ. अंजली दाभाडे, सौ. श्रुती भुरण यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
कृषी मेळाव्यामुळे महिला बचतगटांना मिळाली प्रेरणा
मनोगतात सौ. दीप्ती सावंतदेसाई, सौ. गीता फाळके, सौ. सुप्रिया उतेकर, आर्या थरवळ, वीणा फाळके यांनी उमेदमुळे महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी मेळाव्यात महिला बचतगटांना मोफत स्टॉल देऊन मोठी संधी उपलब्ध झाली. यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात देखील तुमची साथ मिळावी, अशी अपेक्षा या महिलांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.



