आपला जिल्हा

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव वाचनाने अनुभव विश्व विस्तारते – उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

रत्नागिरी – मराठी भाषेच्या सवंर्धनासाठी, प्रचार, प्रसारासाठी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात येतो. पुस्तक वाचनाने आपले अनुभव विश्व विस्तारते, सर्वांगीण विकासासाठी वाचन प्रेरणादायी ठरते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी केले.

येथील अल्प बचत सभागृहात मराठी भाषा समिती, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी श्रीमती साठे म्हणाल्या, मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा, यासाठी शासनाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सध्याच्या मोबाईल, समाज माध्यमांच्या आभासी जगात पुस्तकाचे वाचन कमी होत आहे. परंतु, पुस्तक वाचनानेच आपले अनुभव विश्व विस्तारित जाते. विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने आवर्जुन सहभाग घ्यावा, त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित करावे.

ओंकार आठवले, सरगम कांबळे, मृण्मयी जोग, वेदांती राव, तृप्ती मदने आदी स्पर्धकांनी भाषणे करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मराठी भाषा समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी प्रस्ताविकात समितीच्या कार्याबाबत माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसिलदार हणमंत म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सुमिता शिरभाते, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रविंद्र कांबळे आदींनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कोकण साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button