
धाराशिव,(ता.१४): बैल पोळा म्हणजे आनंदाचा क्षण , वर्षानुवर्षे शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा आणि कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या बळीराजाच्या जोडीदाराचा.! यंदा मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असतानाही मराठवाड्याच्या शेतकरी राजाने जीवाचा मैतर असलेल्या आपल्या बैलाची विधिवत पूजा करून श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
बैल पोळ्याच्या आदल्या रात्री बैलांची खांदे मळणी केली जाते.त्याच्या वशिंडाला तूप आणि हळद लावून त्याची खांदे मळणी केली जाते.त्यानंतर बैलांना भरपूर चारा टाकण्यात येतो.आणि त्याला शेतकामातून दोन दिवस रजा देण्यात येते.
दुसऱ्या दिवशी बैलांची शिंगे रंगबेरंगी रंगवून त्यावर बेगडं लावण्यात आली.शिवाय बैलांच्या माथ्यावर सुंदर नक्षीदार ढाल लावून तसेच अंगावर विविध नक्षीकाम असणाऱ्या डौलदार झुली पांघरूण्यात आल्या.बैलांच्या गळ्यामध्ये चंगाळे बांधून गावातील मारुती मंदिराला पाच फेऱ्या मारून मोठ्या उत्साहाने बैलाची गावामधून पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढण्यात आली.
या पारंपरिक मिरवणुकीत ‘ चौर चौर चांगभलं …पाऊस आला चांगभलं..’ अशी पावसाला आर्त विनवणी देखील गाव देवता मारुती चरणी केली.



