आपला जिल्हा

गणेशोत्सव काळात स्थानिक नागरीक आणि चाकरमानी यांची गैरसोय होता कामा नये खा.विनायक राऊत यांच्या महामार्ग अधिका-यांना सूचना

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – गणेशोत्सव काळात स्थानिक नागरीक आणि चाकरमानी यांची गैरसोय होता कामा नये अशा स्पष्ट सूचना खा.विनायक राऊत यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दौ-यादरम्यान दिल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्या नागरिकांना खड्ड्याचा सामना करावा लागू नये म्हणून रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसमवेत महामार्गाची स्वतः पाहणी केली. यावेळी खासदार राऊत यांच्यासोबत अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. हिंदू धर्मातील सर्वांचे आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाचे आगमन येत्या काहीच दिवसावर येऊन ठेपले आहे. मुंबईकर चाकरमानी कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान मोठमोठे शहरातून येथे चाकरमानी येत असताना त्यांना खराब रस्त्याच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे या विषयात विविध राजकीय मंडळी आणि मंत्री महोदय नागरिकांच्या समाधानासाठी दौरे करत असून प्रत्यक्षात खड्डे जैसे थे आहेत अनेक चाकरमान्यांनी तर संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत की आमच्यासाठी खड्डे वेगळे करा आणि रस्ता वेगळा करा अनेक ठिकाणी खड्ड्यात रस्ते पडल्याचे चित्र दिसत आहे.गणेशोत्सव
कोकणवासियांचा एक आवडता सण. येत्या काही दिवसात कोकणवासीय मोठ्या संख्येने मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करणार आहेत. सध्या या महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असुन जुना डांबरी रस्ता उखडुन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गणेशोत्सवापुर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणातील एक मार्गिका सुरू करण्याचा राज्यकर्त्यांचा दावा फोल ठरला आहे आणि म्हणूनच आज खा.राऊत यांनी महामार्गावरील लांजा वाकेड ते संगमेश्वर चिपळूण या टप्प्यातील रस्त्याची पाहणी केली.

यावेळी वाकेड ते लांजा मार्गावरील कॉंक्रीटीकरण झालेला रस्ता व जुना डांबरी रस्ता यांना जोडणाऱ्या भागात असलेले खड्डे तसेच लांजा शहराच्या रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले लोखंडी बॅरीकेट्स यामुळे होणारी वाहतुक कोंडी व नागरीकांना होणारा त्रास याविषयी अधिकारी व कंत्राटदार यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. देवधे गाव व वेरळ घाटातील रस्ता येथील खड्डे बुजविण्याविषयी तसेच आ़ंजणारी पूल भागात रस्ता दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत. पाली बसस्टॅन्ड व संपुर्ण बाजारपेठेतून जाणाऱ्या महामार्गाचे काम प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असुन त्याचा फटका ग्रामस्थ, व्यापारी तसेच नजीकच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्यावर सदर ठिकाणी दिवस रात्र काम सुरू ठेवून गणेशोत्सवापुर्वी रस्ता खड्डेमुक्त करा अशा सुचना दिल्या आहेत. यापुढील भागात चरवेली गाव, झरेवाडी, हातखंबा वाहतुक पोलीस चौकीजवळ तसेच हतखंबा तिठा ते निवळी गाव, निवळी घाट, बावनदी ते तळेकांटे भागात सुरू असणारे खोदकाम व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी याबाबत आवश्यक सुचना दिल्या. वांद्री बौद्धवाडी येथील खोदकामामुळे स्मशानभूमीकडे जाण्यास वाट न उरल्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. आंबेड बुद्रुक येथील महामार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजुस भराव खचुन रस्ता उंचसखल झाल्याचे पाहणीदरम्यान आढळुन आले असता यावर योग्य तो उपाय तातडीने करण्याच्या सुचना खा.राऊत यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी येणारे चाकरमानी व ग्रामस्थ यांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्याच्या दृष्टीने महामार्गाची दुरुस्ती ताबडतोब करण्यात यावी अशा प्रकारची सुचना संबधित अधिकारी व कंत्राटदार यांना दिल्या आहेत. या पाहणी दौऱ्यात महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.जाधव व इतर अधिकारी वर्ग तसेच कंत्राटदार कंपनीचे अधिकारी सहभागी झाले होते. खा .विनायक राऊत यांनी दिलेल्या सूचनांची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके,राजू महाडिक, जि.प माजी अध्यक्ष रोहन बने आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button