सह्याद्री’कुशीत ‘तिवरे’ गावी पर्यावरण मंडळाने अनुभवल्या ‘श्रावण’सरी

चिपळूण- हिरवागार श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस असा अनुभव देणारा ‘श्रावण’सरी कार्यक्रम ‘सह्याद्री’कुशीतील ‘तिवरे’ गावी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नुकताच संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरण मंडळाच्या प्रतिनिधींनी ‘श्रावणसरी’ उपक्रमांतर्गत नुकतीच पूर्वसह्याद्री खोऱ्यातील तिवरे गावाला भेट दिली. गावातील ‘भेंदवाडी’ परिसरातील निसर्गरम्य वातावरणात पर्यावरणीय प्रबोधन विचारांचा जागर यावेळी करण्यात आला.
उत्सवाच्या आणि उत्साहाच्या श्रावणपर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण या शब्दानं मानवी मन हे संवेदना, भावना, अनुभव आदी अंगांनी प्रफुल्लित होतं. याकाळात निसर्गाबरोबर आपणही मनोमन मोहरून उठतो आणि स्वतःला आपल्या संस्कृतीशी आणि श्रावणाशी बांधून घेत असतो. पावसाळा सुरू झाला की जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे निसर्गाचं रूप पालटतं. ग्रीष्माने आलेले सुकेपण, रुक्षपण आणि निस्तेजता जाऊन आषाढातील पावसाच्या आगमनाने सृष्टी तरारते. श्रावण मासात ती हिरवागार शालू नेसल्यागत बहरते. याचा अनुभव, मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक, धीरज वाटेकर, मोहन पाटील, मायावती शिपटे आणि जिल्हाध्यक्ष सतिश मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून सहभागी झालेल्या तीस पर्यावरणप्रेमींनी घेतला.
तिवरे भेंदवाडीत सौ. अंजली आणि अरुण पुजारे या दाम्पत्याने घर बांधून निसर्गाच्या सान्निध्यात उर्वरित आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या राहात्या आणि कृषी पर्यटनाचे स्वरूप दिलेल्या घराला २ जुलै २०१९रोजी तिवरे धरणफुटीचा मोठा फटका बसला होता. तिवरे धरण फुटले तेव्हा हे उभयता याच घरात वास्तव्याला होते. उदरनिर्वाहाच्या अपुऱ्या संधींसह कोकणात सध्या दरडी आणि तत्सम घटनांमुळे स्थलांतराचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर धरण फुटीसारखी घटना पचवून पुन्हा जिद्दीने त्याच ठिकाणी आपल्या मनातील निसर्ग-कृषी संकुल उभारण्याचे पुजारे दाम्पत्याचे प्रयत्न अभिमानास्पद असल्याचे मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी सांगितले. महाडिक यांच्या हस्ते यावेळी पुजारे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.



