स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय वसतिगृह सुरू करण्यासाठी अभाविप चे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

मुंबई – मागील वर्षी मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस मधील स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय वसतिगृहाचे उद्घाटन महामहिम राज्यपाल यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडले. या उद्घाटना नंतर लगेचच हे वसतिगृह विद्यार्थ्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अजून हे वसतिगृह विद्यार्थ्यांच्या निवासासाठी उपलब्ध झालेले नाही .याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखिल विद्यापीठाने कुठलेही ठोस पाऊले उचलली नाहीत.
या वसतिगृहाची पाहणी करता अजून देखिल अनेक कामकाज बाकी असल्याचे दिसून येत असून वसतिगृह सुरू करण्यासाठी आवश्यक फर्निचर कंत्राट प्रकिया अजून अपूर्ण आहे. वीज जोडणी पूर्ण झालेली नाही, मुबलक पाणी व्यवस्था नाही,उपहारगृह कंत्राट प्रक्रिया पूर्ण करून उपहारगृह व्यवस्था अपूर्ण आहे .वसतिगृहास लागून असलेल्या विद्यापीठाच्या संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या सर्व कामासंहित विद्यापीठ परिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक विभागानुसार जागा आरक्षित करून प्रवेश प्रकिया सुरू करणे आवश्यक आहे.याबाबत वसतिगृह सुरू करण्यासाठी अजून ६ महिन्याचा कालावधी लागेल असे लेखी म्हणणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. सुनील भिरूड यांनी कळविले आहे.
मुंबई विद्यापीठ हे देशातील सर्वात जुने विद्यापीठ असून देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मुंबई विद्यापीठात येत असतात. मुंबई सारख्या शहरात खाजगी जागेत निवास घेऊन राहणे हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नसून ,विद्यापीठाकडे वसतिगृह उपलब्ध असताना ते सुरू करण्यासाठी अजून ६ महिन्याचा अवधी लागेल असे कळविणे विद्यार्थ्यांच्या भावनांची केलेली थट्टा आहे. अगोदरच १ वर्षे उलटून गेलेले असताना अजून ६ महिन्याचा अवधी लागणे यावरून विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांप्रती किती निष्काळजी आहे हे दिसून येते. असे मत अभाविप कोंकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी व्यक्त केले.
सर्व सोयीसुविधायुक्त वसतिगृह विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते कामे पूर्ण करण्यासाठी लागणार कालावधी लक्षात घेऊन या संबधिचा कालबद्ध कार्यक्रम विद्यापीठ प्रशासनाने लिखित स्वरूपात जाहीर करणे अशी मागणी असताना वसतिगृह सुरू करण्यासाठी अजून ६ महिन्याचा कालावधी लावणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे.अभाविप विद्यापीठ प्रशासनाच्या उत्तरावर असमाधानी असून लवकरात लवकर वसतिगृह सुरू करण्यासाठी अभाविप पुढील काळात गेट मिटींग, सोशल मीडियावर जनआंदोलन ,कुलगुरू घेराव,अश्या विविध माध्यमातून आंदोलन आणखी तीव्र करेल असा इशारा अभाविप मुंबई महानगर मंत्री निधी गाला यांनी दिला .



