मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – मुंबई विद्यापीठ सेवक यांच्या वतीने मुंबई विद्यापीठ व रसायन तंत्रज्ञान संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना १० वी व १२ वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते फोर्ट येथे करण्यात आला.
यावेळी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते एकूण २४ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशास्तिपत्रक, शैक्षणिक साहित्य व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या २४ विद्यार्थ्यांमधून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येकी एका विद्यार्थ्यास रु.५,५५५/- शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थी-पालक आणि कर्मचाऱ्यांना अनमोल शैक्षणिक मार्गदर्शन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व विद्यार्थी गुणगौरव समारंभ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असून, यापुढे विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे, अशी सूचना करून अभिनंदन केले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठ सेवक, विविध संघटना आणि पतपेढीचे प्रतिनिधी, विद्यार्थांचे पालक व सहकारी बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.



