राजिवली ग्रामपंचायतीला वाली कोण ? पथदिवे बंद ; कोकण आयुक्तांसह जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देतील का ?
संगमेश्वर प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील येडगेवाडी येथील पथदिवे गेल्या दोन महीन्यांपासून बंद स्थितीत आहेत. या दिव्यांकडे पहायला सध्या ग्रामपंचायत ला वालीच नसल्याचे दिसून येत आहे. राजिवली सरपंच आणि उपसरपंच यांना ११ मे २०२३ रोजी लाच घेताना पकडल्यापासून ते राजिवली ग्रामपचायत कारभार ठप्पच आहे. लाच प्रकरणामुळे राजिवली ग्रामपंचायतीची प्रतिमा संपुर्ण महाराष्ट्रात मलिन झाली आहे. तर लाच प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या कामाकाजावर देखील परीणाम झाल्याचे दिसून येत आहे. लाच प्रकरणानंतर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अनेक लोकाभिमुख कामांना खीळ बसली असून आता राजिवली ग्रामपंचायतीला वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजिवली ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील कलम ३९ (१) अंतर्गत कारवाई आणि इतर कारभारात कोकण आयुक्तांसह, रत्नागिरी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी ( जि. प ) तरी गांभीर्याने लक्ष घालतील का असा थेट प्रश्न विचारला जावू लागला आहे.
राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ६ वाड्यांमधे सरपंच शमिका पाटोळे यांच्या कार्यकाळात उपसरपंच तुकाराम येडगे यांच्या संकल्पनेतून पथदिव्यांचा प्रकल्प राबविण्यात आला होता. येडगेवाडी, घाडगेवाडी, बौध्दवाडी, रातांबी, शिर्केवाडी, निकमवाडी पथदिव्यांमुळे या सहा वाड्या उजळून निघाल्या माजी सरपंच शमिका पाटोळे यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२२ पर्यंत होता तो पर्यंत येथील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती कामे नियमित केली जात होती मात्र नंतरच्या काळात या कामाकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे स्थानिक नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे तर पथदिव्यांप्रमाणे ग्रामपंचायतमधील कारभारातील अंधाराचा सामना करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनाने कलम ३९ (१) प्रमाणे तातडीने कार्यवाही करुन पथदिव्यांप्रमाणे इतर कामात ही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे.



