रांगव धरणा लगत डोंगराला गेले तडे,. वेळीच उपाययोजना होणं गरजेचं…
संगमेश्वर प्रतिनिधी - मिलिंद चव्हाण

संगमेश्वर तालुक्यातील रांगव येथील लघुपाटबंधारे विभागाच्या धरणाच्या लगत वरच्या बाजूला डोंगराला तडे जाऊन डोंगर दुभंगल्याचे दिसून येते. काही वर्षांपासून हा डोंगर थोडा थोडा दुभंगत असल्याचे पहायला मिळते. काही वर्षांपूर्वी लोकमत मधून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते त्यावेळी याचा धरणाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा धरण विभागाच्या वतीने देण्यात आला होता. मात्र या भेगा दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात याचा परिणाम धरणाच्या सुरक्षेवर होईल की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रांगव येथील लघुपाटबंधारे विभागाचे धरण हे अनेकवेळा विविध समस्यांमुळे चर्चेत आहे. धरण भागात होणारी अवैध वृक्षतोड, तसेच या भागातील जमिनीची बेकायदेशीर विक्री व अवैधरित्या होणारे उतख्तनन या अनेक विषयांवर लोकमत मधून प्रकाश टाकण्यात. या धरणाचे व कालव्याचे काम आजही अर्धवट स्थितीत असल्याचे दिसून येते. धरणाच्या अर्धवट सुरक्षा व्यवस्थेमुळे येथे अनेक अपघात घडून जिवीतहानी ही झाल्याचे समोर येते. या समस्यांमुळे हे धरण अनेकवेळा चर्चेत आले आहे.
काहिवर्षापासून या धरणाच्या लगतच्या डोंगराला भेगा पडण्याचे सत्र सुरू आहे. यावर लोकमत ने अनेकवेळा प्रकाशझोत टाकला आहे. मात्र यामुळे धरणाच्या सुरक्षेला धोका नसल्याचा निर्वाळा धरणविभागाच्या वतीने देण्यात आला. मात्र सध्या प्रत्यक्ष पहाणी केली असता डोंगर सरकून या भेगांचे रूपांतर दरीत झाल्याचे पहायला मिळते. त्यामुळे भविष्यात याचा धोका धरणाच्या सुरक्षेला होईल की काय? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.
तरी धरण विभागाकडून तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन योग्य उपाययोजना करून भविष्यात निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी जोर धरत आहे..
याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मोहीते यांच्याशी संपर्क साधला असता याचा धरणाला कोणताही धोका नसला तरी तात्काळ पहाणी करून सदर घटनेचा अहवाल वरिष्ठ विभागाला पाठविला जाईल असे सांगितले.



