आरवली – येडगेवाडी रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात ; सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार शेखर निकम यांचे श्रेय

संगमेश्वर – तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ या मार्गावरील कि.मी २३ ते ३० मधील एकूण ७ कि.मी रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी संतोष येडगे यांनी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन २०२३ च्या अर्थसंकलपात ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर करुन घेतले होते. त्या कामाला आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली असून पहील्या टप्प्यातीव ७ कि.मी राजिवली बौध्दवाडी ते येडगेवाडी असा टप्पा पुर्ण केला जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक सुखकर होणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कुचांबे ते येडगेवाडी हा १५ कि.मी रस्ता २००९ ला पाटबंधारे विभागाने प्रकल्पग्रस्तांसाठी तयार केला होता या मार्गाला दर्जोन्नत करण्यासाठी संतोष येडगे यांनी २०१७ ला विशेष प्रयत्न केले होते. तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करुन घेतला होता. रस्ता दर्जोन्नत केल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी तातडीने देखभाल दुरुस्ती अंतर्गत डांबरीकरण कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला.
आरवली ते येडगेवाडी ० ते २ आणि २३ ते ३० मधील रुंदीकरण आणि डांबरीकरण कामासाठी आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल ६ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी पहील्या टप्प्यातील राजिवली बौध्दवाडी ते येडगेवाडी या २३ ते ३० कि.मी मधील कामाला सुरुवात झाली असून दुस-या टप्प्यातील ० ते २ आरवली ते आरवली रेल्वे स्टेशन हे काम होणार आहे. या कामासाठी आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामाला मंजुरी दिल्याने संतोष येडगे यांनी त्यांना विशेष धन्यवाद दिले.



