जयगड बंदर ते सातारा नवीन दृतगती महामार्ग होणार ?

रत्नागिरी – राज्यातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयगड बंदराची जोडणी लवकरच सातारा जिल्ह्याशी केली जाणार आहे. यासाठी जयगड बंदर-चिपळूण-सातारा असा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंबंधीचा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर असून लवकरच या महामार्गाचा आराखडा तयार करून हा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. हा द्रुतगती महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास जयगड बंदरावरून साताऱ्याला केवळ एका तासात पोहोचता येणार आहे. तेव्हा हा द्रुतगती महामार्ग नेमका कसा असणार आहे आणि कोणती यंत्रणा या महामार्गाची उभारणी करणार आहे, याचा हा आढावा…
खोल पाण्याचे जयगड बंदर
रत्नागिरी जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले जयगड बंदर अत्यंत महत्त्वाचे आणि प्रगत बंदर आहे. हे खासगी बंदर खोल पाण्याचे बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदराची खोली १७.५ मीटर इतकी आहे. या बंदराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बंदर वर्षभर, ३६५ दिवस मालवाहतुकीची हाताळणी करते. कोणत्याही हवामानात हे बंदर कार्यान्वित असते. आंबा, काजू आणि मासे निर्यातीसाठीचे हब म्हणून या बंदराचा सध्या विकास केला जात आहे. अशा या बंदराला राज्यातील इतर जिल्ह्यांशी जोडण्याची आणि मालवाहतूक सोपी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जयगड बंदर थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडले जाणार आहे.
जयगड बंदर ते सातारा द्रुतगती महामार्ग?
राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून ४००० किमीहून अधिकचे रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडूनही राज्यातील दळणवळण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून हातभार लावला जात आहे. राज्यभरात एनएचएआयकडून २००० किमीहून अधिकचे रस्ते बांधले जात आहेत. यात वाढवण ते तवा द्रुतगती महामार्गासह मुंबई-पुणे तिसऱ्या द्रुतगती महामार्गासह अन्य रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. यात आता आणखी एका रस्ते प्रकल्पाची भर पडणार आहे. तो म्हणजे जयगड बंदर ते सातारा द्रुतगती महामार्ग. एनएचएआयने जयगड बंदर ते सातारा असा नवीन द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने आता ठोस पावलेही उचलली आहेत.
जयगड बंदराला साताऱ्याशी जोडण्याची गरज का?
महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि प्रगत असे जयगड बंदर असून या बंदरापर्यंत वाहनांना, मालवाहू वाहनांना अतिजलद आणि सुलभ पोहोचता यावे यासाठी एनएचएआयने जयगड बंदर ते सातारा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक, कृषी आणि व्यापारी केंद्रांशी थेट बंदर जोडले जावे आणि मालवाहतुकीचा मार्ग सुलभ व्हावा, हाही यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच प्रादेशिक आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याच्या दृष्टीनेही हा महामार्ग महत्त्वाचा मानला जात आहे. तर यामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविण्यासही मदत होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता एनएचएआयने जयगड बंदर ते सातारा असा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
९८ किमीचा महामार्ग?
एनएचएआयच्या प्राथमिक आराखड्यानुसार जयगड बंदर-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्ग ९८ किमीचा असणार आहे. हा महामार्ग रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गासाठी अंदाजे ९६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जयगड बंदर ते सातारा प्रवास करण्यासाठी आजच्या घडीला साडेपाच तास किंवा कधी कधी त्याहीपेक्षा अधिक वेळ लागतो. मात्र हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास हा प्रवास केवळ एका तासात शक्य होणार आहे. दरम्यान, हा प्रकल्प सध्या प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार झाल्यानंतरच महामार्गाची एकूण अंतिम लांबी, महामार्ग नेमका कुठून सुरू होणार आणि कुठे संपणार, तसेच कोणकोणत्या भागातून, गावांतून जाणार हे स्पष्ट होईल. तर किती मार्गिकेचा हा महामार्ग असणार, यात किती पूल वा इतर प्रकारची बांधकामे असणार, हेही आराखडा अंतिम झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
प्रकल्पाची सद्यःस्थिती काय?
सध्या प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. प्रकल्पाचा सविस्तर बृहत आराखडा तयार करण्यासाठी एनएचएआयकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. सल्लागार नियुक्त झाल्यानंतर सल्लागाराच्या माध्यमातून बृहत आराखडा तयार केला जाईल. या आराखड्यास मान्यता घेऊन त्यानंतर भूसंपादन केले जाईल आणि त्यापुढे निविदा प्रक्रिया राबवित प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होऊन प्रकल्प पूर्ण होऊन जयगड बंदर ते सातारा प्रवास अवघ्या एका तासात करण्यासाठी वाहनचालक- प्रवाशांना काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.



