आपला जिल्हा

राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वोत्तम ठरेल – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूल विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत व्यक्त केला विश्वास

मुंबई – महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये विविध लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. या माध्यमातून होत असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपत्तीग्रस्तांच्या घरातही आनंदाचा एक दिवा पेटेल यासाठी सामाजिक जाणिवेतून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर मागील काही महिन्यात मंत्रालयातील तसेच क्षेत्रीय पातळीवरील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी याचबरोबर जमाबंदी आयुक्त तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत यंत्रणेने सेवा पंधरवडा, वाळू धोरण, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे, तुकडेबंदी, जिवंत सातबारा, स्थानिक विषय आदींमध्ये प्रचंड काम केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण यंत्रणेचे कौतुक केले. सर्वसामान्यांना वाळू तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी वाळू धोरणाचे पालन करून नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व वाळू गटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करावेत. मदत व पुनर्वसन विभागामार्फत आपत्तीग्रस्तांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या मदतीच्या निधीचे योग्य वितरण करावे, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले.

बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button