संगमेश्वर तालुक्यातील शिधापत्रिका धारकांनी शासनाच्या ॲानलाईन सेवेचा लाभ घ्यावा पुरवठा निरीक्षण अधिकारी महेंद्र कांबळे यांचे आवाहन.
रास्तभाव दुकानांमधून ३० जून, २०२५ पर्यंत पुढील तीन महीन्यांचे अन्नधान्य मिळणार

संगमेश्वर – तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेत तालुक्यातील ७२२४ आंत्योदय तर २९९०२ प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिका धारकांची नोंद आहे. या शिधापत्रिका धारकांना त्यांच्या कामासाठी तालुका स्तरावर अनेक वेळा खेटा माराव्या लागत आहेत. यामध्ये जनतेचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. यातून सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळावा म्हणून नागरिकांनी पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवरुन शिधापत्रिकेतील सुधारणांबाबत ॲानलाईन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी महेंद्र कांबळे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने शिधापत्रिकेतील काही बदल करण्यासाठी mahafood.gov.in आणि rcms.gov.in या दोन वेबसाईटवरुन public Login चा पर्याय उपलब्ध करुन देत जनतेला अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन गहाळ झालेली शिधापत्रिका, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नव्याने नाव सामाविष्ठ करणे, पत्ता बदल करणे , नावातील बदल आणि इतर कामे आता घर बसल्या होणार आहेत या सुविधांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन संगमेश्वर तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी महेंद्र कांबळे यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेवून ३ महीन्यांचे धान्य लाभार्थ्यांना मिळणार
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१३ अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो.आगामी पावसाळा आणि पुर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ॲागस्ट, २०२५ पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना ३० जून, २०२५ पर्यंत रास्तभाव दुकानांमधून वितरीत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ॲागस्ट, २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानांमधून करावी असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी महेंद्र कांबळे यांनी केले आहे.



