ताज्या घडामोडी

संगमेश्वर – पाटण घाटमार्ग डीपीआर सर्व्हेक्षण कामाची पाहणी ; कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्या कंपनीला सूचना

संगमेश्वर – तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गापासून सुरु होणाऱ्या संगमेश्वर – पाटण घाटमार्ग सर्व्हेक्षण कामाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी आज दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी यांनी संगमेश्वर तालुक्यातील नेरदवाडी या ठिकाणी भेट देवून सर्वेक्षण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या पाहणी दौ-यावेळी संगमेश्वर – पाटण घाटमार्ग समन्वयक समिती चे समन्वयक संतोष येडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जाधव,शाखा अभियंता अक्षय बोरसे, लक्ष्मीकांत खातू, गुरुप्रसाद भिंगार्डे, ओंकार लोध, निल खातू, संतोष खातू, भागोजी शेळके, माजी सरपंच कोंडीबा शेळके, कोंडीबा सिदू शेळके, पांडुरंग येडगे, प्रकाश शेलार, कृष्णा कोळापटे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संगमेश्वर ते पाटण या ४६ कि.मी मधील लांबीच्या सर्व्हेक्षणाचे काम मोनार्च सर्व्हेयर्स ॲन्ड इंजिनीअरींग कंसल्टंट लि. ( Monarch Surveyors And Engineering Consultants LTD ) या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीचे तेजस माने यांनी घाटमार्ग रस्ता कामाची माहीती कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांना दिली यावेळी श्री.ओटवणेकर यांनी रस्ता वळण त्या रस्त्याच्या पाटण तालुक्यातील लांबीबाबत सूचना मांडल्या तर या सर्व्हेक्षण बाबत अचूक अहवाल तयार करुन तो विहीत मुदतीत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

संगमेश्वर ते चाफेर ( पाटण ) हा एकूण ४६.६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी उद्योगमंत्री तथा त्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, सातारा जिल्हा पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री ना.शंभूराज देसाई, चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून सक्षम पाठपुरावा करणार असल्याचे समन्वयक संतोष येडगे यांनी सांगितले.

संगमेश्वर – पाटण घाटमार्ग डीपीआर साठी महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. डीपीआर साठी तरतूद केलेल्या निधीसाठी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

संगमेश्वर पासून सुरु होणा-या या घाटमार्गाचा हातखंबा, रत्नागिरी, बावनदी, आंबेड, कोसुंब,करंबेळे, वाशी,धामणी ,तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग , चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे,नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे, आदी आणि खाडीपट्ट्यातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परीसरातील गावांमधील लाखो नागरीकांना या मार्गाचा फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे हा रस्ता पुर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.

संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे भूमिपूजन १९९९ मधील युती सरकारच्या काळात झाले होते. सध्या युती सरकार सत्तेत आहे आणि याच सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प पुर्ण व्हावा अशी जनतेची अपेक्षा आहे. या घाटमार्गासाठी दोन्ही जिल्ह्यातील ४ लाखांपेक्षा अघिक जनता आग्रही आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button