विश्वविक्रम करणाऱ्या युवकांनी घेतली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट; रस्ता सुरक्षा, पर्यावरण रक्षणाबाबत साधला संवाद

कोल्हापूर – गिर्यारोहक आणि गिनीज बुक, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप आणि गोविंदा नंद यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेवून पर्यावरण रक्षण, रस्ता सुरक्षा आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा अभियान, पर्यावरण रक्षण, वने व वन्य जीवांचे संरक्षण, नदी वाचवा मोहीम आदी विषयांवर जनजागृती करण्याबरोबरच शासकीय योजनांचा प्रसारही ते करत आहेत.
गिर्यारोहक अवध लाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच युवकांनी जगभरातील ११ देशांमध्ये ४ लाख ४८ हजार किलोमीटर पदयात्रा केली आहे. त्यांनी २०१८ मध्ये माऊंट ऐवरेस्टमधील यात्रा केली आहे. विश्व पदयात्रेदरम्यान पाच जणांनी १४ कोटी ५० लाख झाडांचे वृक्षारोपण केले आहे. या पाच जणांनी उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात येथे पदयात्रा केली असून, आता ते महाराष्ट्रात आले आहेत. ते महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा करणार आहेत. त्यांनी उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खिरी येथून पदयात्रा सुरु केली आहे. आता या यात्रेत २० जणांची टीम आहे. या यात्रेमार्फत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची जनजागृती ते करत आहेत. याशिवाय पर्यावरण रक्षण, प्रदूषण रोखणे आदी बाबतही ते जनजागृती करत आहेत.



