बाल सुधारगृहासाठी पालक म्हणून प्रशासन नेहमी पाठीशी राहील – जिल्हाधिकारी अमोल येडगे
जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्घाटन

कोल्हापूर – बाल सुधारगृहामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, ती मागणी करा, पालक या नात्याने प्रशासन ती पूर्ण करेल असे सांगून नेहमीच प्रशासन आपल्या पाठीशी उभे राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

गारगोटी तालुका भुदरगड येथील मौनी विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवात ते बोलत होते. या बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, सरपंच प्रकाश भास्कर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, गारगोटी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कदम, कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत चव्हाण, शाहु कुमार भवनचे मुख्याध्यापक डॉ. एस. बी. शिंदे, जवाहर बाल भवनचे मुख्याध्यापक दीपक मोरे, बाल न्याय मंडळाचे सदस्य शिशिकांत कुरणे, बालकल्याण समितीच्या सदस्या अॅड अश्विनी खाडे, ॲड शिल्पा सुतार, पद्मजा गोरे, अरविंद चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला खेळाडूंची परंपरा लाभली आहे. नुकतेच आपल्या जिल्ह्यातील स्वप्नील कुसाळे याने ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपली खेळाडूवृत्ती ओळखून त्याप्रमाणे त्या क्षेत्रात आपले कॅरिअर निवडावे. खेळांमध्ये हार जित होतचं राहते, त्यामुळे खचून न जाता खेळात जिद्द आणि चिकाटी ठेवा. आपण जरी बाल सुधारगृहात राहत असाल तरी प्रशासन आपल्या पाठीशी आहे. आपल्या जीवनात आपण पुढे कुठल्या क्षेत्रात कॅरिअर करायचे आहे ते आतापासूनच ओळखून त्या प्रमाणे तयारी करा, विद्यार्थ्यांनी स्वप्न बघावी आणि ती स्वप्न सत्यात आणण्यासाठी शालेय जीवनापासून कष्ट करावे, आपले शिक्षण पूर्ण करुन देशाच्या विकासामध्ये आपले योगदान द्यावे, असे सांगून ते म्हणाले, वर्षातून एकदा या स्पर्धा होत असतात. या स्पर्धेमध्ये क्रिकेट, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, लंगडी, 100 मीटर धावणे हे वेगवेगळे खेळ तर होतातच, त्याचबरोबर निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा होत असतात. अश्या स्पर्धेच्या निमित्ताने वर्षातून एकदा सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थी एकत्रित येण्याचा हा क्षण आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थांनी पुढील तीन दिवस सुरु असणाऱ्या या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तसेच सर्व क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सहभागही घ्यावा, असे सांगून सर्व विद्यार्थी शिक्षक यांना स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.
प्रस्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातूनच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळवण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. या वर्षी आयोजित केलेल्या बाल महोत्सवात जिल्ह्यातील 10 बाल सुधारगृहातील जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. बाल महोत्सवाचे आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री.दाते यांनी मानले. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी- कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
***



