आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सारथी,बार्टी,महाज्योती परीक्षेच्या मूल्यमापनाला स्थगिती ; पेपर फुटीबाबतचे आरोप पुणे विद्यापीठ प्रशासनाने फेटाळले.

पुणे – सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी 10 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या फेलोशिप चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने जाहीर केला आहे. मात्र, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली असून या परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही,असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पीएच.डी. फेलोशिपच्या संयुक्त परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे १० जानेवारी रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील परीक्षा केंद्रांमार्फत आयोजित करण्यात आले होते. या परीक्षेसाठी ए, बी, सी व डी अशा चार प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती. या प्रश्नपत्रिका संचांची छपाई दोन वेगवेगळ्या मुद्रणालयांकडून गोपनीयरीत्या करुन घेण्यात आली होती. त्यामुळे छपाई करण्याच्या स्वरुपामध्ये बदल असू शकतो. सदर प्रश्नपत्रिका संचांची अत्यंत गोपनीय पध्दतीने आणि विहित सुरक्षा मानकांचे पालन करुन छपाई करण्यात आली होती. ती संबंधित परीक्षा केंद्रांवर सीलबंद स्वरुपात पोहचविण्यात आली होती.

प्रश्नपत्रिका संच सी आणि डी मधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचनेमधील सूचना क्र.३(३) मध्ये प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे, सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारु नये, असे नमूद करण्यात आलेले होते. ए आणि बी प्रश्नपत्रिका संचास सील होते, परंतु सी आणि डी प्रश्नपत्रिका संच वेगळ्या मुद्रणालयाकडून छपाई करुन घेतले असल्याने त्यांना सील नव्हते. सीलबंद प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे काही परीक्षार्थी हे परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांच्या बाबतीत परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

सी आणि डी संचामधील प्रत्येक प्रश्नपत्रिका संचास सील नसले तरी प्रश्नपत्रिका संच असलेल्या पाकिटांना सील करण्यात आले होते. सदर पाकिटांचे सील परीक्षा केंद्रांवरच उघडण्यात आले होते. परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांची प्रत कोणत्याही व्यक्तिकडे कोणत्याही स्वरुपात (Hard Copy किंवा Soft Copy) उपलब्ध नव्हती. तसेच त्या प्रश्नपत्रिकांमधील मजकूरदेखील कोणत्याही व्यक्तिला कळालेला नव्हता. संपूर्ण परीक्षा प्रक्रियादेखील सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे सदर परीक्षेच्या पेपर फुटीसंदर्भात केलेले आरोप हे पूर्णतः निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.याबाबत परीक्षार्थीनी दिलेल्या निवेदनाचा विचार करता, विद्यापीठाने सदर परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित केले आहे,असे सेट समन्वयक बाळासाहेब कापडणीस यांनी प्रसिध्द केलेल्या प्रकटनात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button