चिपळूण शहराची हद्द वाढवा,कोकण प्रादेशिक पक्षाची मागणी

चिपळूण -पूर नियंत्रण रेषेमुळे चिपळूण शहराचा विकास ठप्प पडला आहे.अनधिकृत बांधकामे वाढत आहेत.त्यामुळे भविष्यात फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.त्याचा आताच विचार करून शहराच्या आजूबाजूचे खेर्डी,कलंब्स्ते,कापसाळ, कामथे,कालुस्ते अशी गावे नगरपालिका हद्दीत समाविष्ट करून शहराची हद्द वाढवावी व शहर विकासाला चालना द्यावी अशी मागणी कोकण प्रादेशिक पक्षाने मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रसाद शिंगटे यांच्याकडे केली आहे.
नुकतेच स्थापन झालेल्या कोकण प्रादेशिक पक्षाचे संस्थापक संयोजक ऍड.ओवेस पेचकर व पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची भेट घेऊन चिपळूण शहरातील पूर नियंत्रण रेषा तसेच अन्य विषयावर विस्तृत चर्चा केली यावेळी शहराचा खुंटलेला व ठप्प झालेल्या विकासावर कायदेशीर तसेच शासकीय परिपत्रकानुसार विवेचन करण्यात आले.चिपळूण हे मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती महत्वाचे शहर आहे.अत्यंत झपाट्याने वाढणारे शहर म्हणून चिपळूणची ओळख आहे.परंतु पूर नियंत्रण रेषेमुळे येथील विकास ठप्प पडला असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
ब्लु व रेड लाईन मुळे नवीन बांधकामांना तसेच विकासकांना परवानगी देता येत नाही.परंतु त्याचे उलट परिणाम होत आहेत.शहरात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत.ही बांधकामे भविष्यात दूरगामी परिणाम करतील.नंतर अनधिकृत बांधकामे काढणे फार कठीण काम होणार आहे.तसेच विकास ठप्प पडल्याने नागरिकांचे फार मोठे नुकसान होणार आहे.शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर देखील अनिष्ट परिणाम होणार आहेत.त्यामुळे आता पर्याय उभा करणे आवश्यक बनले असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शहराच्या जवळच कामथे,कापसाळ,कालुस्ते कलंब्स्ते अशी गावे आहेत आणि ती पूर रेषेच्या बाहेर आहेत.भविष्यात त्या ठिकाणी पुराची भीती देखील नाही.अशी गावे नगरपालिका हद्दीत समाविष्ट करून घेतल्यास शहराची हद्द वाढेल,तसेच आपली नगरपालिका ब वर्गातून अ वर्गात येईल त्याअनुषंगाने शासनाकडून अधिक निधी उपलब्ध होईल आणि विकासाला चालना मिळेल.त्याचप्रमाणे त्या गावातील नागरिकांचा देखील आर्थिक विकास होईल,त्यांच्या जमिनीला शहरप्रमाणे महत्व प्राप्त होईल.त्यामुळे आपण प्रशासक म्हणून शासनाकडे या बाबत प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा अशी मागणी कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे करण्यात आली आहे.



