कडवई तुरळ रस्त्यासाठी रिक्षा संघटनेचा सार्वजनिक बांधकामाला पंधरा दिवसाचा अलटिमेटम .

संगमेश्वर – तालुक्यातील कडवई ते तुरळ या रस्त्याची सध्या भयानक दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून वाहतुक करणे दिवसेंदिवस जीवघेणे ठरत आहे . या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रिक्षा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे .मंगळवारी रिक्षासंघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले असून पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास कितीही पूर्वसूचना न देता या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनेच्या वतीने अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे .
कडवई तुरळ या साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम २०२० साली जवळ जवळ नव्वद लाख रुपये खर्ची करून नव्याने करण्यात आले .रुमाना कन्स्ट्रक्शन कँपनिच्या जाहिद खान या ठेकेदाराने केलेला हा रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर चारच महिन्यात खराब होण्यास सुरुवात झाली . यावर रिक्षा मालक चालक संघटना कडवई -तुरळ- चिखली यांच्यावतीने काम निकृष्ठ झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिले गेले . मात्र बांधकाम विभागाच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही .
हे काम निकृष्ठ झाल्याचा चौकशी अहवाल कार्यकारी अभियंता रत्नागिरी याना उपअभियंता पूजा इंगवले यांनी सादर केला मात्र वरिष्ठ स्तरावरून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही . या ठेकेदारावर राजकीय वरदहस्त असल्यानेच ही कारवाई दडपण्यात आल्याचा आरोप रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केला आहे .ठेकेदाराचे अंतिम बिल व अनामत रक्कम देण्यात येऊ नये असे पत्र ही बांधकाम विभागाला रिक्षा संघटनेच्या वतीने देण्यात आलेले असतानाही त्याची सर्व बिले अडा करण्यात आल्याचे समजते .एरव्ही पन्नास हजारच्या कामाचाही माहिती फलक लावला गेला नसेल तर बिल अदा न करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जवळ जवळ एक कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्यावर तीन वर्षे उलटली तरीही माहिती फलक लावला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .
सध्या या रस्त्याची अवस्था भयानक झाली असून या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे . वाहनाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून प्रवाशांना फार मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत.अपघाताचे प्रमाणही वाढले आहे .यामुळे वाहनचालक व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत .
रिक्षा संघटनेचा सर्व व्यवसाय याच रस्त्यावर अवलंबून असल्याने रिक्षाव्यवसाईकांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे .रिक्षा संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन पंधरा दिवसाचा अलटिमेंटम देण्यात आला आहे . पंधरा दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता चक्का जाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे . यावेळी शाखा अभियंता प्रदीप बोरसे ,रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण ,खजिनदार रुपेश रहाटे , सदस्य अरफाज खतीब , राजेंद्र भोजने आदी उपस्थित होते .



