वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामार्फत आयोजित भव्य कृषी महोत्सवात सादर होणार ‘गनिमी कावा’ नृत्यनाटिका

चिपळूण – चिपळूण शहरामध्ये वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कायम वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमार्फत चर्चेत असते तर याच डेअरी प्रकल्पांतर्गत यावर्षी ५ ते ७ जानेवारी दरम्यान भव्य असे कृषी व पशु प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच या कृषी प्रदर्शन महोत्सवामध्ये वाशिष्ठी डेअरी मार्फत व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव तसेच मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता चिपळूण नगरपरिषदेच्या सावरकर मैदानामध्ये ‘कृष्णाई इव्हेंट्स मुंबई’ प्रस्तुत आणि दिग्दर्शन ओंकार वसुधा अशोक सावंत यांनी संकल्पनेतून सत्यात उतरवले “गनिमी कावा” ‘गाथा छत्रपती शिवाजी महाराजांची’ या उत्कृष्ट अशा नृत्यनाटिकेचे आयोजनही करण्यात आलेले आहे.
“गनिमी कावा” ‘गाथा छत्रपती शिवाजी महाराजांची’ हि नृत्यनाटिका ओंकार वसुधा अशोक सावंत यांनी दिग्दर्शित केलेली आहे, तर त्याचे निर्मिती व्यवस्थापन गणेश टिकम आणि अर्चना ओंकार सावंत यांनी केलेले आहे. तसेच या नृत्यनाटिकेच्या नृत्यदिग्दर्शनाची कमान अर्चना ओंकार सावंत आणि ओंकार वसुधा अशोक सावंत, प्रकाश योजना चेतन पडवळ, नेपथ्य पालेकर आणि मंडळी, ग्राफिक्स महेश वाडेकर तसेच नृत्यनाटिके ची वेशभूषा अर्चना ओंकार सावंत यांनी सांभाळली आहे.
चिपळूणच्या रसिकांसाठी विशेष गोष्ट म्हणजे या नृत्यनाटिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात घडलेल्या विशेष प्रसंगांना नृत्यरूपात कृष्णाई इव्हेंट्सच्या टीमकडून उजाळा देण्यात येणार आहे. त्यामध्ये उत्कृष्टरित्या दिग्दर्शन केलेले प्रसंग रसिक प्रेक्षकांसाठी एक विशेष पर्वणी असणार आहेत. महाराजांच्या जन्माअगोदरचा महाराष्ट्र, शिव जन्म, रायरेश्वर शपथ, तोरणागड मोहीम, अफजलखान वध, पावनखिंड ‘रणसंग्राम’, शाहिस्तेखानावरील हल्ला, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नेत्रदीपक असा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण टीम कडून सादर करण्यात येणार आहे.
वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव तसेच मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी चिपळूण शहर परिसरातील रहिवासी नागरिकांना या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



